लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मालमत्ता कर आणि थकबाकीची ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त वसुली करण्यावर पालिकेने भर दिला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या टॉप टेन यादीत वरळीतील ‘सुभदा’ या आमदारांच्या गृहनिर्माण सोसायटीने १६ कोटी ८४ लाखांचा मालमत्ता कर न भरल्याचे उघड झाले आहे. एकूण थकबाकी सुमारे ४०३ कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये बड्या उद्योजकांनी थकवलेला कर सुमारे ३४० कोटी एवढा आहे.
दहांपैकी बहुसंख्य जण हे इन्फ्रास्ट्रक्चर, मिल आणि गृहनिर्माण क्षेत्रातील आहेत. पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याचे करवसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. क्षमता असूनही करभरणा न केलेल्या थकबाकीदारांची संपत्ती जप्त करण्याच्या पवित्र्यात पालिका आहे. वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खात्याच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जप्तीची कारवाई टाळा
या मालमत्ताधारकांनी विहित कालावधीमध्ये करभरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेवर टाच आणणे किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी सूचना नोटिसीत देण्यात आली आहे. त्यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी लागलीच करभरणा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘टॉप टेन’ थकबाकीदार
- एल अँड टी स्कॉमी इंजिनीअरिंग (एफ उत्तर विभाग)- ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये
- रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) - ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये
- एचडीआयएल (एच पूर्व) - ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये
- पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण) - ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये
- एचडीआयएल (के पूर्व) - ४४ कोटी ५ लाख ५४,०३५ रु.
- रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) - १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये
- सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण) - १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये
- नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग) - १६ कोटी १ लाख ८० हजार ६३ रुपये
- ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) - १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये
- गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि. (के दक्षिण विभाग) - ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये.