संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:27 AM2023-03-01T11:27:05+5:302023-03-01T11:28:55+5:30

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि आजचा दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळानं झालेली पाहायला मिळाली.

MLAs of all parties unite against Sanjay Raut demand Infringement of rights Legislature be called Chor Mandal | संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?

संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?

googlenewsNext

मुंबई-

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि आजचा दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळानं झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळाला चोरमंडळ म्हणणं संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राऊतांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घेतली आहे. 

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी करणारं पत्र दिलं. त्यावरील चर्चेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊंतावर कडक कारवाईची मागणी केली. तसंच संजय राऊतांनी केलेलं विधान हे संपूर्ण विधीमंडळातील सदस्यांना उद्देशून केलं आहे आणि हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारं नाही. त्यांनी विधीमंडळाचा अपमान केला आहे, त्यामुळे अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असं आशिष शेलार म्हणाले. 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचं म्हटलं. पण त्यांनी संजय राऊत यांचं थेट नाव घेणं टाळलं. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असं विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरंच असं विधान केलं आहे का? हेही तपासून पाहिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केलं असेल तर त्याविधानाशी आम्ही सहमत नाही, असं अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, राहुल नार्वेकर हे हक्कंभगाच्या नोटीसवर आदेश देत असतानाच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाची नोटीस आता हक्कभंग समितीकडे पाठवली जाणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

Web Title: MLAs of all parties unite against Sanjay Raut demand Infringement of rights Legislature be called Chor Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.