मुंबई/बीड - राज्याच्या राजकारणात गेल्या ७ ते ८ दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या दिवसापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळेच, सोशल मीडियावरही अजित पवार ट्रेंड करत आहेत. मात्र, मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. मात्र, या चर्चेवरुन आता महाविकास आघाडीतील नेते समोर येऊन प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही, अजित पवार कुठेही जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिलं. तर, सुषमा अंधारे यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं असून भाजपनेच वावड्या उठवल्याचं त्यांनी म्हटलं.
ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र, आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. परंतु, इतर काही असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले असून आम्हाला भाजपच्या मुजोरी विरोधात लढणे क्रमप्राप्त असल्याचं अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल आणि आमच्या सहकारी आमदारांबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेतल्या आणि भाजपसोबत जाणार, असं दाखवलंय. पण, मी काही सह्या घेतल्या नाही, त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यामुळे आमचे कार्यकर्ते संभ्रमात जातात. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी आपापली कामे करावीते. मीही तुमच्यासारखाच माणूस आहे, त्यामुळे सहनशिलतेचा अंत पाहू नका, अशी मी सर्वांना विनंती करतो.'
काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू - शिरसाट
राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणे नवीन नाही. सगळा फोकस अजित पवारांवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील केस आणि अजित पवारांची नाराजी, यामध्ये काहीही संबंध नाही, असे सांगताना केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू आहे. त्यांच्या आकड्यांचीही बेरीज जुळूत नाही. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आता आघाडीत राहू नये, असे वाटत असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला.