मुंबई : कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी मुलाचा जबाब नोंदवून याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूमागचे गूढ कायम असून, याप्रकरणी नेहरूनगर पोलीस अधिक तपास करत आहे. नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्वेकडील डिग्निटी सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कुडाळकर राहतात. रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचा मुलगा हर्षल घरी आला तेव्हा रजनी (४२) या स्वयंपाक घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. हर्षलने त्यांचा मृतदेह खाली उतरवून पोलिसांना कॉल करून मदत मागितली. घटनेची वर्दी लागताच नेहरूनगर पोलिसांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी त्यांच्या मुलाचा सविस्तर जबाब नोंदवून, अन्य नातेवाईक, शेजारी, कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात येत आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांचा मोबाइल, ओढणी ताब्यात घेतली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर मंगेश कुडाळकर यांनाही धक्का बसल्याने त्यांना चेंबूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात त्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. रजनी या मंगेश कुडाळकर यांची दुसरी पत्नी. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.
मोबाइलची मदत -- रजनी यांच्या ताब्यात घेतलेल्या मोबाइलच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांचे अखेर कुणाशी आणि काय बोलणे झाले? घटनेच्या दिवशी नेमके काय घडले? नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे त्या तणावात होत्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे. - या प्रकरणी अद्याप कुणाकडून कुठलीही तक्रार आलेली नाही. याप्रकरणी सर्वांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले.