मुंबई - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. विविध मुद्द्यावरुन हे अधिवेशन गाजत असलं तरी नेहमीच अधिवेशनात चर्चेत राहिले आमदार प्रकाश गजभिये यंदाही आपल्या वेशभुषेमुळे चर्चेत आले आहेत. भोपाळमधील भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी हेमंत करकरे यांचा वेश परिधान करुन पोलीस वर्दीमध्ये विधान भवनात प्रवेश केला.
यावेळी प्रकाश गजभिये यांनी मी प्रज्ञाच्या शापाने मेलो नाही ही अंधश्रद्धा आहे. मी देशासाठी शहीद झालो आहे अशा आशयाचे पोस्टर घेऊन प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा निषेध केला.
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या या विधानामुळे भाजपा अडचणीत आली होती.
प्रकाश गजभिये हे नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत येतात. मागील अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन केले होते. आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही अशी टीका त्यांनी केली होती.
तर दुसरीकडे संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करुन आंब्याची पेटी हातात घेतली होती.