मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे एमएमआरडीएला आपले प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नसून प्रस्तावित कामांचा विलंब शक्य तेवढा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शनिवारी मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात या मार्गिकेवरील ३० स्थानकांच्या परिसरातील बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण (एमएमआय) योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
मेट्रो प्रकल्प २ अ (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व) आणि मार्ग ७ (गुंदवली ते दहिसर पूर्व) या दोन्ही मार्गिका पुढल्या वर्षाअखेरीपर्यंत कार्यान्वीत करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे लागू झालेला लॉकडाऊन आणि भविष्यातील आव्हानाचा सामना करत काम पूर्ण करताना एमएमआरडीएला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निर्धारीत वेळेत हे काम पूर्ण होणे शक्य नाही. मात्र, या मार्गिकांशी संलग्न असलेल्या एमएमआय योजनेलाही विलंब लागू नये यासाठी प्रयत्न झाले सुरू आहेत. या मार्गिकांवरील ३० मेट्रो स्टेशनच्या परिसरात सायकल ट्रॅक, सुशोभित पदपथ, सीसीटीव्ही यंत्रणा, बस वाहतूकीसाठी मार्गिका, स्ट्रीट फर्निचर, हरित पदपथ, स्टेशनात प्रवेश करण्यासाठी रॅम्प आदी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने एमएमआय हा महत्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. ३० स्टेशनसाठी ३५६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्या प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी निविदेव्दारे सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.
प्राथमिक प्रस्तावानुसार प्रत्येक स्टेशनसाठी सरासरी २५ कोटी खर्च करण्याची तयारी होती. मात्र, त्याला मुरड घालून हा खर्च ११ कोटी ९० लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यांत अपेक्षित असलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या सुधारीत प्रस्तावाला मंजूरी अपेक्षित होती. मात्र, सुरवातीला विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यानंतर कोरोनाचे संकट यामुळे ही बैठकच झालेली नाही. मात्र, त्यानंतरही निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत हे विशेष.