एमएमआरडीए वडाळ्यामध्ये उभारणार नवे बिझनेस हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:17 AM2020-01-29T05:17:49+5:302020-01-29T05:17:57+5:30
वडाळा येथील मोनोरेलच्या स्थानकाच्या जवळ मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबची उभारणी करण्यात येणार आहे.
मुंबई : नरिमन पॉइंट आणि वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) याप्रमाणे वडाळ्यालाही तिसरे बिझनेस हब बनविण्याची मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) योजना आहे. त्यानुसार, वडाळा येथील मोनोरेलच्या स्थानकाच्या जवळ मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील तीनही बिझनेस हब एकामेकांना भविष्यात जोडण्याची एमएमआरडीएची योजना आहे.
एमएमआरडीएतर्फे चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा कार्यन्वित होता. यानंतर, वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पाही कार्यन्वित केला. यामुळे मध्यावर्ती असलेल्या वडाळा मोनोरेलच्या नजीकच बिझनेस हब उभारण्याची योजना आहे. वडाळ्यामध्ये १५६.५२ हेक्टर जमीन आहे. यातील १८.४४ हेक्टर जमिनीवर ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार आहे. यासाठी बेस्टच्या आणिक बस डेपोच्या जागेचाही वापर करण्यात येणार आहे.
वडाळा ट्रक टर्मिनलच्याजवळ गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत झोपड्या मोठ्या प्रमाणावर वसल्या होत्या, या झोपड्यांवर एमएमआरडीएने नुकतीच कारवाई करून, या झोपड्या हटवून जमीन मोकळी केली आहे.
वडाळा अधिसूचित क्षेत्राच्या नियोजनाचे काम सध्या एमएमआरडीएकडे आहे. यामध्ये शाळा आणि रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये वडाळा मोनोरेल डेपोच्या जागी व्यावसायिक उपयोग करण्याचा प्रस्ताव असून, सध्या त्याबाबत विचारविनिमय सुरू असून, त्याची योजना लवकरच मांडण्यात येणार आहे.
वडाळा ट्रक टर्मिनल येथील आंतरराज्य बस टर्मिनल
आंतरराज्य बससेवेवर नियमन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी आणि इतर राज्यांतील परिवहन, खासगी बससेवा क्षेत्र यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मुंबईमध्ये एक आंतरराज्य बस टर्मिनल विकसित होण्याची आवश्यकता आहे. सर्वंकष परिवहन अभ्यास असवालामधील शिफारसीनुसार, आंतरराज्य बस टर्मिनलच्या बांधकाम आणि विकासासाठी वडाळा ट्रक टर्मिनल येथे जमिनीचे आरक्षण करण्यात आलेले आहे. त्यानंतर, त्याचा व्यवहार्यता अभ्यास करून विकसित करण्यात येणार आहे.
वडाळा भारवाहक तळाचा विकास
वडाळा ट्रक टर्मिनलसाठी प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने आणि माल वाहतूक उद्योगाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने वडाळा येथे सुमारे ६६ हेक्टर जमिनीवर भारवाहक तळ विकसित व स्थापन करण्याचे काम हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यामध्ये मूलभूत सोयींचा विकास करण्याचे काम पूर्ण झाले आहे.