एमएमआरडीएच्या बस बंद करणार? बेस्टचे थकवले दहा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:11 AM2018-12-22T04:11:48+5:302018-12-22T04:12:01+5:30

आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे.

MMRDA bus closes? Best Tired of 10 Crore | एमएमआरडीएच्या बस बंद करणार? बेस्टचे थकवले दहा कोटी

एमएमआरडीएच्या बस बंद करणार? बेस्टचे थकवले दहा कोटी

Next

मुंबई : आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे. याबाबत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बेस्ट उपक्रमामध्ये करार झाला होता. मात्र बेस्ट दुरुस्तीच्या खर्चापोटी आठ कोटी रुपये प्राधिकरणाने अद्याप बेस्टकडे जमा केलेले नाहीत. ही रक्कम लवकर न दिल्यास बस सेवा बंद करण्याचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे.
वांद्रे कुर्ला संकुल या बस मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने मार्च २०१८ पासून येथील पाच मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरू केली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. करारानुसार एमएमआरडीएने २५ हायब्रीड बसगाड्या खरेदी केल्या. चालक व वाहकांचे वेतन एमएमआरडीए देणार होते.
आर्थिक संकटात असल्याने कामगारांचे वेतन देण्यासही बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. अशावेळी आठ कोटी थकणे ही गंभीर बाब असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. याबाबत स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएला ही थकीत रक्कम त्वरित जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
पुन्हा एकदा त्यांना स्मरण करून देण्यात येईल, त्यानंतरही पैसे देण्यास एमएमआरडीएने टाळाटाळ केल्यास वांद्रे स्थानक ते वांद्रे संकुल या मार्गावर धावणारी वातानुकूलित बस सेवा बंद करू, असे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

बिल देण्याची प्रकिया सुरू
१० आॅगस्ट २०१७ ला एमएमआरडीए आणि बेस्ट दरम्यान एमओयूवर स्वाक्षरी झाली. १६ मार्च २०१८ ला २५ हायब्रीड बस या मार्गावर सुरू करण्यात आल्या. त्याप्रमाणे १० जुलै २०१८ ला मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे १.१ कोटी रुपयांचे बिल तसेच ९ नोव्हेंबर २०१८ ला मे आणि जून महिन्याचे १.५ कोटी रुपयांचे बिल देण्यात आले आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून या बिलांची छाननी केली जात आहे. वरील बिल देण्याची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू झाली आहे.
- दिलीप कवठकर, एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क)

३२ आसनी वातानुकूलित, लो फ्लोअर हायब्रीड बसमध्ये मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, डिजिटल डिस्प्ले, प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा, वायफाय आणि तिकीट देण्यासाठी स्वयंचलित यंत्र आहे.
या बस डिझेल आणि विजेवर चालतात. इंजीन चालू असतानाच या गाडीची बॅटरी पुन्हा चार्ज करता येते. या प्रत्येक बसची किंमत एक कोटी ६१ लाख रुपये.
वांद्रे टर्मिनस हिरे बाजार, कुर्ला स्टेशन-एसीबीएल, वांद्रे बस स्थानक-सीए इन्स्टिट्यूट, सायन स्थानक - कलानगर - वांद्रे - कुर्ला संकुल आणि सायन स्थानक - एलबीएस मार्ग - बीकेसी या मार्गावर या बसेस धावतात.

Web Title: MMRDA bus closes? Best Tired of 10 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.