मुंबईत चीनला दे धक्का! मोनोरेलचे कंत्राट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:17 AM2020-06-20T03:17:30+5:302020-06-20T03:17:46+5:30
एमएमआरडीएचा निर्णय; आता मेक इन इंडिया
मुंबई : मुंबईतल्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणाऱ्या मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रद्द केल्या आहेत. दहा मोनोरेलच्या रॅकसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र चीन आणि भारतामधील वादामुळे मोनोबाबतची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
आता मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय तंत्रज्ञान भागीदार शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर सर्वच स्तरांतून चीनचा निषेध केला जात आहे. शिवाय चिनी साहित्याची होळी केली जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनदेखील येथील मोनोरेलसाठीच्या चिनी कंपन्यांकडून मागविण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाने दहा मोनोरेलच्या रॅकच्या कंत्राटाकरिता दोन चिनी कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. मात्र त्या रद्द करून आता भेल आणि बीईएमएल या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्यात येईल.
चिनी कंपन्यांकडून मोनोरेलच्या कंत्राटातील अटींची फेरमांडणी करण्याबाबत सूचित केले जात होते. मात्र प्राधिकरणाला हे शक्य होत नव्हते. आता तर मेक इन इंडियासारखा उपक्रम, भारतीय कंपन्यांना चालना देण्याकरिता ही निविदा रद्द करण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोविड १९ आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आणि मेक
इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या विविध धोरणांच्या अनुषंगाने, विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय तंत्रज्ञान भागीदार शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लक्षात घेता सध्याची निविदा रद्द करून तातडीने प्रस्तुत प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमएमआरडीएला मोनोरेलच्या डब्यांच्या स्पेअर पार्ट्ससाठी परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. तेव्हा पुन्हा एकदा स्कोमीसारखी परिस्थिती निर्माण करायची नाही. दोन्ही चिनी कंपन्या निविदा अटी बदलण्याचे म्हणणे मांडत आहेत. परिणामी प्रशासनाने भारतातील तंत्रज्ञान भागीदारांचा शोध घेण्याचा आणि ते भारतात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए