थकबाकी वसूल करण्यात एमएमआरडीए अपयशी, तीन हजार कोटींची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:27 AM2017-10-27T02:27:18+5:302017-10-27T02:27:30+5:30
मुंबई : तीन हजारांहून अधिक कोटींची थकबाकी थकबाकीदारांकडून वसूल करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सपशेल अपयशी ठरले आहे.
मुंबई : तीन हजारांहून अधिक कोटींची थकबाकी थकबाकीदारांकडून वसूल करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सपशेल अपयशी ठरले आहे. यात उद्योगपती मुकेश अंबानींपासून आयकर खाते, जमुनाबेन फाउंडेशन, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, नमन हॉटेल, तालीम रिसर्च फाउंडेशन आदींचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये ही माहिती प्राप्त झाली आहे.
गलगली यांनी एमएमआरडीएकडे थकबाकीदारांची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाने १२ सप्टेंबर रोजी सात बड्या थकबाकीदारांस नोटीस बजावत थकबाकीची रक्कम अदा करण्याची ताकीद दिली. यात मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी, अंबानी यांचीच जमनालाल हिराचंद अंबानी फाउंडेशन, आयकर खाते, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, नमन हॉटेल आणि तालीम रिसर्च फाउंडेशनचा समावेश आहे.
अंबानी यांनी तीन जमिनी लीजवर घेतल्या असून, दोन ठिकाणी अतिरिक्त एफएसआय बांधकामासाठी विकत घेतले. दोन्ही ठिकाणी अतिरिक्त एफएसआयचे ११३७.७५ कोटी अदाच केले नाही. तसेच चार वर्षांत बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही जागांवर सुरू असलेल्या बांधकामासाठी अतिरिक्त अधिमूल्य १६०० कोटी अदा केले नाही. मेसर्स जमनालाल हिराचंद अंबानी फाउंडेशनने ३१ कोटी अदा केले नाहीत. इंडियन न्यूजपेपर सोसायटीने बांधकाम चार वर्षांत पूर्ण न केल्यामुळे ५४.७४ कोटी अतिरिक्त प्रीमियम अदा केले नाही; आणि अतिरिक्त एफएसआयचे ५०.५२ कोटीसुद्धा अदा केले नाहीत. मेसर्स नमन हॉटेलचे ३२ कोटी, तालीम रिसर्च फाउंडेशनचे ३३ कोटी, आयकर खात्याचे १ कोटी, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सचे २५ कोटी अदा केले नाहीत. अशी एकूण तीन हजारांहून अधिक कोटींची रक्कम थकबाकी आहे.
सीबीआय, इंडियन चार्टर्ड अकाउंट्स, पासपोर्ट आॅफिस, अकाउंटंट आॅफ जनरल आणि कामगार आयुक्त या शासकीय संस्थेने अतिरिक्त प्रीमियम अदा केले; तर बँक आॅफ इंडिया, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, इंडियन आॅइल आणि ओएनजीसी या खासगी सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेने रक्कम अदा केली आहे. तसेच भारत डायमंड बोर्स, टाटा कंपनी, टीसीजी, ईआयएच, पराईनी डेव्हलपर्स, जेट एअरवेज, रघुलीला रिअल इस्टेट, स्टारलाईटसारख्या खासगी संस्थांनी अतिरिक्त प्रीमियमची रक्कम अदा केली आहे.