अखेर एमएमआरडीएने घेतला मोनोरेलचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:31 AM2018-12-15T06:31:12+5:302018-12-15T06:31:31+5:30

व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्याचा आरोप; स्कोमी, एल अँड टी कंपनीला दाखविला बाहेरचा रस्ता

MMRDA finally took possession of Monorail | अखेर एमएमआरडीएने घेतला मोनोरेलचा ताबा

अखेर एमएमआरडीएने घेतला मोनोरेलचा ताबा

Next

मुंबई : मोनो रेल्वेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या स्कोमी, एल अ‍ॅण्ड टी कंपनीला अखेर एमएमआरडीएने बाहेरचा रस्ता दाखवला. या कंपन्यांकडून व्यवस्थापनाची जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली जात नसल्याचे उघड झाल्याने मोनोचा ताबा स्वत:कडे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मोनो रेल्वे प्रकल्पातील चेंबूर ते जेकब सर्कल या टप्प्यातील मोनोच्या व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी स्कोमी, एल अ‍ॅण्ड टी कंपनीवर पहिल्या दिवसापासून सोपविण्यात आली होती. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रति ट्रिप ४ हजार ६०० रुपये कंपनीला देत होती. त्यानंतरही मोनोची देखभाल-व्यवस्थापनात त्रुटी असल्याचे समोर आले होते. असे असूनही स्कोमी, एल अ‍ॅण्ड टी कंपनीने देखभाल-व्यस्थापनाचा खर्च वाढवून मागितला.

एमएमआरडीएकडे पर्याय नसल्याने प्रति ट्रिप ४ हजार ६०० वरून प्रति ट्रिप १० हजार ६०० रुपये इतकी रक्कम वाढवून देण्यात आली. मात्र, त्यानंतरही कंपनीकडून व्यवस्थापन-देखभालीमध्ये कमालीचा हलगर्जीपणा केला जात असल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले. गेल्या वर्षी मोनोच्या डब्याला आग लागल्यानंतर मोनो सेवा तब्बल ९ महिन्यांसाठी बंद राहिली. यामुळे एमएमआरडीएला बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मोनो मार्गावर अपघात, गाडीला आग लागण्याचे प्रकार यामुळेदेखील प्रवाशांनी मोनोकडे पाठ फिरवली. त्यामुळे एमएमआरडीएला प्रति दिवस ५ ते ६ लाखांचे नुकसान सहन करावे लागले.

मोनोच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्यासोबतच एमएमआरडीएच्या अटी-शर्तींचेही कंपन्यांकडून उल्लंघन होत होते. सूचनांची अंमलबजावणीही होताना दिसत नव्हती. त्यामुळे अखेर स्कोेमी, एल अ‍ॅण्ड टी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत एमएमआरडीएने मोनोच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वत:कडे घेतली.

अधिकारी, कर्मचारी होणार वर्ग
एमएमआरडीएने स्कोमी, एल अँड टी कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवत शुक्रवार, १४ डिसेंबरपासून मोनोचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे मोनोतील सर्व अधिकारी-कर्मचारी आता एमएमआरडीएकडे वर्ग होतील. मोनोची जबाबदारी पूर्णपणे ‘एमएमआरडीए’ पेलणार असल्याने आर्थिक भार कमी होईल, असा विश्वास एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी व्यक्त केला. सोबतच एमएमआरडीए मोनोमध्ये आणखी चांगल्या सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

5-6 लाखांचे प्रति दिवस बंद झालेल्या सेवेमुळे एमएमआरडीएला झाले नुकसान.

Web Title: MMRDA finally took possession of Monorail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.