‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 05:53 IST2025-03-29T05:53:12+5:302025-03-29T05:53:56+5:30

ठाण्यातील प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद

MMRDA focuses on metro projects along with road projects Budget of Rs 40 thousand crores presented | ‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२५-२६ या वर्षाचा तब्बल ४०,१८७ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात ६,७३४ कोटी रुपयांनी तरतूद घटली आहे. मात्र, त्याच वेळी यंदा तरतूद केलेल्या निधीपैकी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला असून तब्बल ८७ टक्के निधी हा पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे.

एमएमआरडीए’कडून मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो, सागरी सेतू असे विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. यंदाच्या वर्षात उत्तन विरार सागरी किनारा मार्ग प्रकल्प, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग, ऑरेंज गेट ते गिरगाव भुयारी मार्ग, गायमुख ते फाउंटन आणि पुढे मीरा भाईंदर उन्नत मार्ग, तिसरी मुंबई या प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. तसेच नवे मेट्रो प्रकल्पही हाती घेतले जाणार आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात ४०,१८७ कोटींची तरतूद असून त्यातील ३५,१५१ कोटी प्रकल्पांच्या कामावर खर्च केले जातील. कर्ज आणि त्यावरील व्याजावर ३,३९५ कोटी रुपये खर्च होतील. ‘एमएमआरडीए’ला ३६,९३९ कोटींचा महसूल अपेक्षित असून यंदा ३२४९ कोटी रुपयांची तूट प्रस्तावित केली आहे. 
मुंबई महानगरात मेट्रो जाळे आता ४०० किमीपर्यंत उभारले जाणार आहे. त्यातील २० किमी लांबीचा मेट्रो मार्ग या वर्षात सुरू केला जाणार आहे. ठाणे, भिवंडी, तळोजासह पश्चिम कल्याणचा भाग मेट्रोने जोडला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच एमएमआरडीए ठाणे जिल्ह्यासाठी पाणी वितरण यंत्रणा म्हणून काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांसाठी तरतूद

  • मेट्रो २ ब : २,१५६ कोटी
  • मेट्रो ४ - ३,२४७ कोटी 
  • मेट्रो ५ - १,५८० कोटी 
  • मेट्रो ६ - १,३०३ कोटी 
  • मेट्रो ९ आणि ७ अ - १,१८३ कोटी
  • मेट्रो १२ - १,५०० कोटी 
  • विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प ५२१ कोटी 
  • ठाणे ते बोरीवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) चारपदरी भुयारी मार्ग २,६८४ कोटी
  • ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी १,८१३ कोटी. 
  • उत्तन ते विरार सागरी किनारा प्रकल्प - २,००० कोटी 
  • सूर्या प्रकल्प, काळू प्रकल्प, देहरजी प्रकल्प - १६४५ कोटी 
  • गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग - १,२०० कोटी
  • फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग - १,००० कोटी
  • तिसरी मुंबई - १,००० कोटी 


अपेक्षित उत्पन्न

  • राज्य शासनाकडून मिळणारे दुय्यम कर्ज –  २०८२ कोटी
  • जमिनीची विक्री – ७३४४ कोटी
  • कर्ज –  २२,३२७ कोटी  
  • इतर जमा – ८५६ कोटी 
  • केंद्र महसूल – ३०५ कोटी
  • सरकारचे अनुदान/ विकास हक्क –  १०२४ कोटी 
  • नागरी परिवहन – ३००० कोटी

Web Title: MMRDA focuses on metro projects along with road projects Budget of Rs 40 thousand crores presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.