कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे एमएमआरडीएला 535 कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 05:36 AM2020-11-26T05:36:08+5:302020-11-26T05:36:23+5:30

‘मेट्रो २ ब’ची डेडलाइन लांबणीवर : रखडलेल्या कामांसाठी नवे कंत्राटदार

MMRDA gets Rs 535 crore due to irresponsible work of contractor | कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे एमएमआरडीएला 535 कोटींचा भुर्दंड

कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे एमएमआरडीएला 535 कोटींचा भुर्दंड

Next

संदीप शिंदे

मुंबई : डी.एन. नगर ते मानखुर्द या मेट्रो २ब मार्गिकेवरील कंत्राटदारांच्या बेजबाबदार कारभारामुळे एमएमआरडीएला तब्बल ५३५ कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. या मार्गिकेचे काम जुलै, २०२१पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. नव्या मुदतीनुसार ते जुलै, २०२३ पर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१८ मध्ये एमएमआरडीएने या मार्गिकेच्या तीन पॅकेजसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करून काम सुरू केले. त्यावेळी या कामांसाठी १९२२ कोटींचा खर्च तसेच ४२ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या २४ महिन्यांत जेमतेम ८ ते १० टक्केच काम झाले. कंत्राटदार अत्यंत बेजबाबदारपणे काम करत असल्याने फेब्रुवारी, २०२० मध्ये हे कंत्राट एमएमआरडीएने रद्द केले. त्यानंतर नव्या कंत्राटदारांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यापैकी ३९० कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या मानखुर्द डेपोच्या कामासाठी आहलूवालिया या कंपनीची नियुक्ती एमएमआरडीएने नुकतीच केली. मात्र त्यासाठी ५३० कोटी रुपये मोजावे लागतील.

उर्वरित दोन पॅकेजची निविदा प्रक्रिया ऑगस्टमध्ये जवळपास पूर्ण होत आली होती. मात्र, या कामांमध्ये मेट्रो मार्गिकेवरील आयकाॅनिक पुलांच्या चाही कामांसमावेश करायचा असल्याची सबब देत एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया तडकाफडकी रद्द केली. त्यानंतर १८१ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या तीन पुलांच्या कामांचा समावेश करून दोन पॅकेजच्या स्वतंत्र निविदा काढल्या. या कामांसाठी एमएमआरडीएने अनुक्रमे ११६७ व ५८८ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. निविदा प्रक्रियेतील वित्तीय देकार नुकतेच उघडण्यात आले. यात जे. कुमार आणि एनसीसी या कंपन्यांची निविदा लघुत्तम दराची असून ती अनुक्रमे १३८९ कोटी आणि ७१९ कोटी आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये हे काम १०५८ आणि ४७४ कोटींना देण्यात आले होते. त्यात आयकाॅनिक पुलांच्या १८१ कोटींचा खर्च जोडला तरी खर्च ५३५ कोटी रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट होते.

२०२४ साली धावणार मेट्रो
मूळ नियोजनानुसार जुलै, २०२१ पर्यंत ही मेट्रो सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, पहिली दोन वर्षे कंत्राटदारांनी निष्फळ ठरवली. त्यानंतर जवळपास १० महिने सुधारित निविदा प्रक्रियेत खर्ची पडले. नव्या कंत्राटदारांना काम पूर्ण करण्यासाठी आणखी अडीच वर्षांचा कालावधी दिला जाईल. त्यातही थाेडाफार विलंब अपेक्षित असून २०२४ पूर्वी या मार्गावर मेट्रो धाव घेईल अशी धूसर शक्यता आहे.

Web Title: MMRDA gets Rs 535 crore due to irresponsible work of contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.