Join us

एमएमआरडीएने २१७० खाटांचे कोविड रुग्णालय मुंबई महापालिकेकडे केले सुपूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:42 PM

राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलले गेले आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १७ एप्रिल रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मालाडच्या वलनाई गाव येथे २१७० खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय बांधण्याचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच एमएमआरडीएने २८ जून रोजी हे समर्पित कोविड-१९ रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्त केले. 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलले गेले आहे. सध्या बीएमसीने केलेल्या सूचनांच्या आधारे एमएमआरडीएने तेथे अंतर्गत बदल केले आहेत.  हे कोविड-१९ रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले असून ते अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे.  या ठिकाणी २१७० खाटांच्या कोविड रूग्णापैकी ७० टक्के चांगले ऑक्सिजन बेडस व २०० आयसीसीयू बेड असणार आहे. 

 रूग्णालयात १९० बेडचे इंटेन्सिव्ह केअर युनिट, ऑक्सिजन सुविधायुक्त १५३६ बेड्स, मुलांसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट, २० बेडचे डायलिसिस युनिट, ४० बेडचे ट्रायजेज आणि ३८४ बेडस विलगीकरण रूम असून एकूण २१७० बेडस आहेत.  याव्यतिरिक्त, हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून पोर्टेबल एक्स-रे, सीटी स्कॅनर, ईसीजी मशीन या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सोबत लिक्विड ऑक्सिजनच्या ४ टाक्या बसविण्यात आल्या आहेत.

एमएमआरडीएने २४० सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्थापित केले आहेत. रूग्णाच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे.  डॉक्टर आणि प्रशासकीय कामांसाठी एक खोली तयार करण्यात आली असून तेथे उत्कृष्ट सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. २०२० साली वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात कोविड हेल्थ सेंटर हे अतिशय वेगवान- गतिमान अर्ध-कायम प्रकारचे बांधकाम केले गेले आहे. या रुग्णालयाचा पाया तळ मजल्यापासून १० इंच उंच आहे आणि स्टीलच्या फ्रेम, डबल प्लायवुड आणि पीव्हीसी फ्लोअरिंगपासून बनलेला आहे.  तसेच, नामांकित कंपन्यांकडून रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा करण्यात आला आहे. 

रुग्णालयाचे बांधकाम तातडीने होणे आवश्यक असल्याने कामाची अंदाजे किंमत ९० कोटी रुपये असून त्यापैकी ५७ कोटी रुपये रूग्णालयाच्या बांधकामावर खर्च झाला असून सुमारे ३३ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी खर्च करण्यात आले आहे. एकूण खर्च ८९.६४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिस्थितीची निकड लक्षात घेता प्रत्येक कामासाठी स्वतंत्र किंमतीचा अंदाज आणि निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली होती आणि २९ एप्रिलला एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आणि २४ मे रोजी कंत्राटदारांना कामाचे कार्यादेश देण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस