मुंबई : जुन्या आणि भंगारात निघालेल्या गाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने अशा गाड्यांना स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी स्क्रॅप सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार बीकेसीमध्ये जागेचा शोधही प्राधिकरणाकडून घेतला जात आहे. अशा प्रकारचा राज्यातील पहिलाच प्रकल्प असणार आहे.
पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्यांना बंदी आहे. गाड्या खूप जुन्या झाल्यावर त्या भंगारात काढण्यात येतात. यामुळे भंगाराचा प्रश्न गहन बनत चालला आहे. आता या वाहनांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने पाऊल उचलले आहे. बीकेसीमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने प्राधिकरणाला याबाबत सूचनाही केली होती. त्यानुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
सध्या कुर्ला सीएसटी रोड येथे मोडीत निघालेल्या वाहनांचे मोठे मार्केट आहे. मात्र येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने मोडीत काढली जात नाहीत. शिवाय येथे सुरक्षेसंदर्भात कोणतेही उपाय योजले जात नाहीत. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने निकालात निघालेल्या वाहनांचा खच दिसून येतो. त्याशिवाय रस्त्यावर बेवारस पडलेल्या भंगार गाड्या, अपघातात किंवा अन्य प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली वाहने असतात. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबईतील ३८ टक्के वाहने १४ वर्षे जुनीमुंबईतील जुन्या गाड्यांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी लवकरच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महसूल आणि वन खाते जागा उपलब्ध करून देणार आहे. १५ वर्षे जुनी वाहने प्रकल्पस्थळी आणून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होईल. त्यामुळे वाहनाचा प्रत्येक भाग हा पुन्हा वापरात येईल. साहजिकच यामुळे भंगाराचा तसेच जुन्या वाहनांचा प्रश्नही निकालात निघणार आहे. मुंबईतील ३८ टक्के वाहने १४ वर्षे जुनी आहेत, तर १५ टक्के वाहने ही १० ते १४ वर्षे आयुर्मानाची आहेत.