एमएमआरडीएची एमसीएला चपराक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:21 AM2018-05-01T05:21:12+5:302018-05-01T05:21:12+5:30
भाडे कराराचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला(एमसीए)ला एमएमआरडीएने चपराक दिली
मुंबई : भाडे कराराचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला(एमसीए)ला एमएमआरडीएने चपराक दिली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडावर दोन माउंड गॅलरी बांधण्यासाठी परवानगी देण्यास एमएमआरडीएने नकार दिला आहे. भाडे कराराचा वाद मिटल्यानंतरच माउंड गॅलरी बांधण्यास परवानगी दिली जाईल, असे एमएमआरडीएने एमसीएला स्पष्ट केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
बीकेसी येथील ‘जी ब्लॉक’मधील एमसीएला वितरित भूखंडावर माउंड गॅलरी बांधण्यासाठी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर, एमएमआरडीए प्रशासनाने ही परवानगी नाकारली आणि लीज उल्लंघन वादाचे निराकरण झाल्यानंतर, एमसीएला माउंड गॅलरी बांधण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. ही परवानगी नाकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएने अप्रत्यक्षपणे आशिष शेलार अध्यक्ष असलेल्या एमसीएला चपराक दिली आहे.
आशिष शेलार यांनी २२ आॅगस्ट २०१७ला या भूखंडावर दोन माउंड गॅलरी बांधण्याची परवानगी एमएमआरडीएकडे मागितली. त्यावर
१ सप्टेंबर २०१७ ला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्या या मागणीवर विचार करा, असे आदेश एमएमआरडीए प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर, एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी १९ मार्च २०१८ला एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार आणि वास्तुविशारद शशी प्रभू यांना लेखी पत्र पाठवून, दोन माउंड गॅलरी बांधण्याला परवानगी नाकारत आहोत, असे कळविले.