Join us

मेट्रो २ अ, २ ब आणि ७ साठी एमएमआरडीए सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 2:36 AM

बैठकीत निर्णय : विद्युत, यांत्रिक प्रणालीसाठी कंत्राटदार

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमध्ये गती निर्माण होण्यासाठी एमएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकले आहे. १८.५ किलोमीटर लांबीच्या दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो मार्गिका २ अ , २३.५ किलोमीटर लांबीच्या डी.एन. नगर ते मानखुर्द मेट्रो मार्गिका २ ब आणि १६.५ किलोमीटर लांबीच्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्गिका ७ वरील विद्युत आणि यांत्रिक प्रणालींशी संबंधित कामांसाठी कंत्राटदार नियुक्तीची शिफारस करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

विद्युत आणि यांत्रिक प्रणालींशी संबंधित कामकाजाचे आरेखन, साहित्य पुरवठा, उभारणी, चाचण्या आणि तत्सम कार्यवाहीसाठी मे. स्टर्लिंग अ‍ॅण्ड विल्सन या संस्थेची शिफारस कार्यकारी समितीने या बैठकीत केली. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गिका ७ वरील सर्वच्या सर्व म्हणजे १३ उन्नत स्थानकांशी संबंधित अग्निशोधक आणि अग्निरोधक उपाययोजना राबवण्यासाठी पुढील कामे या कंत्राटदारातर्फे करण्यात येणार आहे. वरील तीनही मार्गिकांच्या ५२ स्थानकांवरील स्वयंचलित भाडे-आकारणी व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आरेखन, निर्मिती, पुरवठा, उभारणी, चाचण्या आणि तत्सम कार्यवाहीसाठी कार्यकारी समितीने मे. डाटामॅटिक्स गोल्बल सर्व्हिसेस आणि मे.ए.ई.पी. टिकेटिंग सोल्युशन्स एस.आर.एल. या संस्थांची संयुक्तपणे नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. अंबरनाथ महापालिका क्षेत्रातील, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५ वरील साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाका या रस्त्याच्या सुधारणेचे काम करण्यासाठीही समितीने मे. जे.पी. एंटरप्राईजेस या संस्थेची निवड केली आहे. कार्यकारी समितीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून वरील तीनही मार्गिकांचे काम वेगाने होण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच आमचे सर्व प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण व्हावेत आणि प्रवाशांना सुखद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी एमएमआरडीए सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे मत एमएमआरडीचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी या वेळी व्यक्त केले. 

टॅग्स :मेट्रोमुंबई