३६६ कोटींची बोली ३२५ कोटींवर
मुंबई : येत्या काही महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणा-या मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात या मार्गिकांच्या स्थानकांच्या सभोवताली मल्टीमोडल इंटिग्रेशनची (एमएमआय) कामे केली जाणार आहेत.या कामांसाठी चार कंत्राटदारांनी सरासरी लघुत्तम १२.७० टक्के जास्त दराने बोली लावली होती. मात्र, एमएमाआडीएने वाटाघाटी केल्यानंतर ४१ कोटी रुपये कमी करण्याची तयारी कंत्राटदाराने दाखवली आहे. त्यामुळे या कामांसाठी आता मुळ अंदाजपत्रकानुसार ३२५ कोटी रुपयेच खर्च होणार आहेत.
प्रवाशांना मेट्रो स्थानकातील प्रवेश सुलभता, आपल्या इच्छित स्थळापर्यंत गतीमान प्रवास, अंतिम स्थानकापर्यंत वाहतूक (लास्ट माईल कनेक्टिव्हीटी) उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक मेट्रो स्थानकावर बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरणाची (मल्टिमोडल इंटिग्रेशन) योजना तयार करण्यात आली आहे. दोन अ आणि सात या मार्गिकांसाठी २५० मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार परिसरात ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ३२५ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार या ३० स्टेशनच्या कामांचे चार पँकेजमध्ये विभाजन करून निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु, त्यासाठी दाखल झालेल्या निविदेतील लघुत्तम बोली ८.२२ ते १६ टक्के जादा दराने दाखल झाल्या होत्या. परंतु, हा ४१ कोटींचा वाढीव खर्च कमी करण्यासाठी एमएमआररडीच्या अधिका-यांनी निविदाकारांशी वाटाघाटी केल्या. त्यानंतर या कंपन्यांनी मुळ अंदाजपत्रकानुसार काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
चार पँकेजचे काम करण्यासाठी आरपीएल इन्फ्रा, रेलकाँन इन्फ्रा प्रोजेक्ट, एन. ए. कन्स्ट्रक्शन आणि के आर कन्स्ट्रक्शन या चार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निविदा अनुक्रमे १६.०४, ८.८२, १५ आणि ११.१६ टक्के जादा दराने होत्या. तो वाढीव खर्च आता होणार नाही. या कामांवर होणा-या खर्चापैकी निम्मा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार आहे.
पँकेज क्र | अंदाजखर्च (कोटींमध्ये) |
१ | ७५.४ |
२ | ८९.२२ |
३ | ८२.६६ |
४ | ७७.३८ |