मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात अचानक संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे एमएमआरडीएच्या विविध मेट्रो प्रकल्पांसाठी स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर म्हणून निवड झालेल्या ४१ उमेदवारांना लॉक डाऊन काळात ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम स्थगित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण आता ऑनलाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या सर्व प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण ठरलेल्या वेळेतच पूर्ण होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महामुंबई मेट्रोसाठी निवड करण्यात आलेल्या ४१ प्रशिक्षणार्थींना टप्रशिक्षण देण्यासाठी हैदराबाद येथील एल अॅन्ड टी मेट्रो प्रशिक्षण अकादमीत पाठविण्यात आले. या सर्वांचे प्रशिक्षण मार्च महिन्यात सुरू होऊन चार महिन्यात पूर्ण होणार होते, मात्र कोरोनाचा प्रसार वाढू लागताच सरकारने संचारबंदी लागू केली. परिणामी या प्रशिक्षण केंद्रालाही टाळे लावण्यात आल्याने प्रशिक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र महानगर आर. ए. राजीव यांनी यावर मार्ग काढून प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली. यामुळे या प्रशिक्षणावर लाॅकडाऊनचा कसलाही परिणाम झाला नसल्याने प्रशिक्षण वेळातच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
स्मार्ट टिव्ही, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट लॅपटॉप वापरून या प्रशिक्षणार्थींना ज्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी ठेवले आहे, तेथे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण ठरलेल्या वेळेतच पूर्ण होईल. या प्रशिक्षण सत्रादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत एक प्रशिक्षणार्थी अमरावतीला गेला होता आणि लॉकडाऊनमुळे त्याला पुन्हा हैद्राबादला येणे शक्य झाले नाही. तोसुद्धा या ऑनलाईन वर्गात त्याचे प्रशिक्षण पूर्ण करत आहे. या सत्रादरम्यान प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्या शंकाचे निरसन करू शकतात.
स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर म्हणून मार्च २०२० मध्ये भरती झालेल्या ४१ कर्मचारी (यामध्ये १८ महिला कर्मचारी आहेत) कामावर रूजू झाले आहेत. या सर्व ४१ कर्मचार्यांना एल अॅण्ड टी मेट्रो रेल अकादमी हैद्राबाद येथे पाठविण्यात आले आहे. पण राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे सर्व प्रशिक्षण वर्ग रद्द करण्यात आले. तथापि महानगर आयुक्त आर. ए राजीव यांच्या निर्देशानुसार हॉटेलच्या रूममध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्ट टिव्हीवर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी ४१ उमेदवारांच्या गटाला प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे ही एक नाविन्यपूर्णपणे पायरी आहे, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.