Join us

मुंबई विद्यापीठाला बाजारभावाने मोबदला देण्याबाबत एमएमआरडीए सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा विकास करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा विकास करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपवण्यात आली आहे. यापुढे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विविध विकासकामांसाठी घेतलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जमिनीचा विद्यापीठाला बाजारभावाने मोबदला द्यावा, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमएमआरडीएला केली असून मुंबई महानगरपालिका व शासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव बनविण्यासाठी सूचना बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

१२ मे २०१६ रोजी एमएमआरडीए आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला होता. रेडिरेकनरनुसार मोबदला आणि विकासकामांचा आराखडा करून देण्याचे आश्वाासन दिले होते. मात्र, आजतागायत कोणत्याही प्रकारचा ठोस कार्यक्रम एमएमआरडीए अथवा मुंबई विद्यापीठ प्रशासन यांनी विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणात दिलेला नाही. यामुळे विद्यापीठाच्या कालिना संकुलाचा विकास अडकून पडला असून त्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याचा दावा सिनेट सदस्यांनी केला. याबाबत त्वरित चौकशी करून महिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांच्या पुढाकाराने सामंत यांनी एमएमआरडीएचे अधिकारी, विद्यापीठ प्रशासन यांची मंगळवारी बैठक घेतली. त्यावेळी एमएमआरडीए विद्यापीठाला देत असलेला मोबदला कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भातील बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

त्याचबरोबर एमएमआरडीए आणि विद्यापीठ प्रशासनानाने यापूर्वी जो विकास आराखडा तयार केला आहे, तो बदलण्यात येणार आहे. यापूर्वी पुढील १४ वर्षाच्या दृष्टीने विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. आता तो आधी पुढील ५ वर्षांसाठी आवश्यक त्या गरजा लक्षात घेऊन तयार करावा, अशी सूचना उदय सामत यांनी केली आहे. संकुलात नवीन इमारती बांधण्यापूर्वी विद्यापीठात सध्या मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. यावेळी बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका, अधिकारी, मुंबई विद्यापीठ वरिष्ठ अधिकारी, कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी, रजिस्ट्रार बळीराम गायकवाड आणि सिनेट सदस्य यांची उपस्थिती होती. यासंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत आणखी एकदा बैठक होणार असून एमएमआरडीएकडून कसा आणि कशा स्वरूपात मोबदला देता येईल यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रदीप सावंत यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उपयोगात येणार असल्याने त्यांना प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.