मुंबई महानगर प्रदेशातील २३७८ खड्डे भरले! एमएमआरडीएने केले काम
By सचिन लुंगसे | Published: August 4, 2023 02:05 PM2023-08-04T14:05:46+5:302023-08-04T14:09:55+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांच्या सुधरणा करत आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांच्या सुधरणा करत आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), शिवडी - वरळी कनेक्टर, ऐरोली कटाई नाका प्रकल्प, छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, एस सी एल आर विस्तार, तसेच विस्तारित MUIP अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या हद्दीतील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्याची जबाबदारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, मुंबई आणि उपनगरांमध्ये ७ मेट्रो रेल प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील खड्डे तत्परतेने भरले
एमएमआरडीएच्या टीमने निर्माणाधिन असलेल्या प्रकल्पांतर्गत २ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण २७८३ खड्ड्यांची नोंद केली असून त्यातील २३७८ खड्डे भरले आहेत. त्यामध्ये १४६७ खड्डे हे रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ११२ किमी लांबीच्या भागातले असून त्यापैकी १३७३ खड्डे भरण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पांच्या अखत्यारीत येणाऱ्या १०० किमी रस्त्यांवर आतापर्यंत १३१६ खड्ड्यांची नोंद झाली असून त्यापैकी १००५ खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ते प्रकल्पांतर्गत ९४ आणि मेट्रो प्रकल्पांतर्गत उर्वरित ३११ खड्डे येत्या ४८ तासात बुझवण्यात येतील.
एमएमआरडीएमार्फत प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांलगत असणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरीत प्रतिसाद पथकाद्वारे (quick response team) तात्काळ भरले जात आहेत. काही रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित केल्यानंतरही कंत्राटदारांकडून डिफेक्ट लायबिलिटी पीरियड (DLP) अंतर्गत रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती ही केली जाते.
एमएमआरडीए खड्डे भरताना येणाऱ्या आव्हानांवर मात करून काम अविरत सुरू
एमएमआरडीएची टीम मुसळधार पाऊस, वाहनांची सततची रहदारी यासह विविध आव्हानांचा सामना करत सर्व खड्डे तत्परतेने भरत आहे. मॅस्टिक अस्फाल्टची उपलब्धता हे देखील आव्हानच आहे, कारण त्याचे बंधन टिकवून ठेवण्यासाठी २०० °C इतकं उच्च तापमान राखणे आवश्यकता असते जे संततधार पावसात कठीण असते. त्यामुळे संततधार पावसात त्वरीत खड्डे भरण्यासाठी तात्पुरते उपाय जसे की, कोल्ड मिक्स, डब्ल्यूएमएम (वेट मिक्स मॅकॅडम), डीबीएम (डेन्स बिटुमिनस मॅकॅडम), आणि पेव्हर ब्लॉक्सचा वापर केला जातो आणि वाहतूक सुरळीत ठेवली जाते. नंतर अधिक टिकाऊ उपाय म्हणून पावसाची उघडीप मिळाल्यावर मास्टिक अस्फाल्टने ते भरले जातात.
हवामान खात्याच्या अहवालानुसार, या मान्सून मध्ये मुंबईत सरासरी २३१८.८० मिमी पाऊस पडला. तर फक्त जुलै महिन्यात ३१ जुलै २०२३ पर्यंत १७६९.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून ती जुलै २०२० च्या तुलनेत ८५५.७ मिमी अधिक आहे. या मान्सून मध्ये शहरात लक्षणीय पाऊस झाला असला तरीही नागरिकांना त्रास होऊ नये याची खात्री करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएची टीम चोवीस तास काम करत आहे.
विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएमार्फत वांद्रे कुर्ला संकुल, ओशिवरा जिल्हा आणि वडाळा ट्रक टर्मिनल क्षेत्र या भागातील अंदाजे २८ किमी काँक्रीट रस्त्यांची देखभाल कंत्राटदारची नेमून करून केली जाते. सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी या भागातील रस्त्याशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी कंत्राटदरामार्फत २४ तास टीम कार्यरत असते.
"एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा विकसित करताना सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार मुंबईत आती मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे एमएमआरडीए राबवित असलेल्या प्रकल्पालगत अनेक ठिकाणी पाणी साचाणे तसेच खड्डे पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व तक्रारींबाबत प्राधिकरणाच्या टीमने नियंत्रण कक्षाद्वारे सर्वांशी समन्वय साधून या तक्रारींचे तत्काळ निरसन केले. मुसळधार पाव सासह आव्हानात्मक वातावरणीय परिस्थितीतही एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर असून नागरिकांना दैनंदिन जीवनात कमीत कमी त्रास होईल याची आम्ही दक्षता घेत आहोत." असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.