राजू काळे, भार्इंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गादरम्यानची वाहतूककोंडी सोडविण्याच्या उद्देशाने पालिकेने प्रस्तावित केलेल्या ६ उड्डाणपुलांऐवजी थेट भार्इंदर पश्चिमेपर्यंत एलेव्हेटेड रस्ता एमएमआरडीए (मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरण) मार्फत विकसित करण्याच्या आ. प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास एमएमआरडीएने नकार दिला आहे. काशिमीरा नाका ते गोल्डन नेस्टदरम्यानच्या छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने या मार्गावर सर्व्हिस रोड निर्माण करण्यास अनुमती दिली होती. सध्या त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वसल्याने तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली होती. परंतु, बिल्डर लॉबीसह राजकारण्यांनी त्यांची बदली घडवून आणल्याने सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे आजमितीस जैसे थे आहेत. पालिकेच्या तत्कालीन महासभेने या मार्गावरील वाहतूककोंडीचे नियोजन करून वाहतुकीला गती देण्याच्या उद्देशाने भार्इंदर पूर्वेकडील दीपक रुग्णालय चौक, शिवार गार्डन, कनाकिया, एस.के. स्टोन, सिल्व्हर पार्क व प्लेझंट पार्क येथे ६ उड्डाणपुलांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार, प्रशासनाने कामाच्या निविदा मागविल्या असता आ. सरनाईक यांनी ठिकठिकाणच्या उड्डाणपुलांऐवजी काशिमीरा नाका ते गोल्डन नेस्टऐवजी रेल्वे मार्गावरून थेट भार्इंदर पश्चिमेकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रस्त्याचा प्रस्ताव तयार करून तो पालिकेला सादर केला. हा रस्ता एमएमआरडीएमार्फत विकसित व्हावा, यासाठी त्यांनी आयुक्त मदन सिंग यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर त्यांची तत्त्वत: मंजुरी मिळविली होती.तसेच एमएमआरडीएचे अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून त्या रस्त्याच्या विकासाची मागणी केली होती.
एलेव्हेटेड रस्त्यास एमएमआरडीएचा नकार
By admin | Published: June 12, 2015 10:53 PM