मेट्रो-७ मार्गिकेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने केले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 02:18 AM2020-02-06T02:18:45+5:302020-02-06T02:19:30+5:30
मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेच्या विविध ...
मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेच्या विविध टप्प्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अंधेरी ते गोरेगाव दरम्यानच्या मार्गिकेचे ३४८ कोटींचे काम सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले होते. मात्र काम खूपच संथ गतीने होत असल्याने एमएमआरडीएने या कंपनीचे काम रद्द केले आहे. आता महिन्याभरामध्ये नव्याने कंत्राटदार नेमण्यात येणार आहे.
मेट्रो-७ मार्गिकेच्या सिव्हिल बांधकामाचे ३४७ कोटी रुपयांचे काम करण्यासाठी एमएमआरडीएने सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची नियुक्ती केली होती. हे काम एमएमआरडीएच्या मुदतीनुसार आतापर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. मात्र आतापर्यंत हे काम ७५ टक्केच झाले आहे. हे काम वेळेमध्ये पूर्ण करण्याबाबत कंपनीला एमएमआरडीएने वारंवार कळवले होते, मात्र तरीही काम संथगतीने सुरू असल्याने एमएमआरडीने कठोर पावले उचलत हे काम सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून काढून घेतले आहे. यासाठी एमएमआरडीने या उर्वरित कामासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढल्या आहेत.
एमएमआरडीएने मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या दोन्ही मार्गिकांची कामे ऑक्टोबरमध्ये संपवण्याची कालमर्यादा ठरवली होती. याबाबत तसे कंत्राटदारांना निर्देशही दिले होते. परंतु हे काम वेळेमध्ये पूर्ण न केल्याने एमएमआरडीएने कंत्राटदाराचे काम रद्द करत त्याची ३५ कोटींची दिलेली बँक गॅरंटी जमा केली आहे. मेट्रो-७ हा मार्ग अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावरून उन्नत मार्गाने तयार करण्यात येणार असून १६.५ किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे.
मेट्रो-७ मार्गिकेच्या संपूर्ण कामाचा खर्च हा ६,२०८ कोटी रुपये इतका आहे. मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या मार्गावर सप्टेंबर २०२० मध्ये पहिला ट्रायल रन घेणार असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता मेट्रो-७ मार्गिकेवरील कंत्राट रद्द करण्यात आल्याने हा ट्रायल रन पुढे ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.