मोनो स्थानकांच्या नावांच्या हक्कांची विक्री, उत्पन्न वाढविण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:51 PM2024-03-22T15:51:45+5:302024-03-22T15:52:30+5:30
आर्थिक तोट्यात असलेल्या मोनोचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे.
मुंबई :
आर्थिक तोट्यात असलेल्या मोनोचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. त्यासाठी मोनोच्या १८ स्थानकांच्या नावांचे अधिकार विकून उत्पन्न मिळविण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. त्यामुळे मेट्रो १ मार्गिकेप्रमाणे आता मोनोच्या स्थानकांनाही कंपन्यांची नावे दिली जाणार आहेत.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो मार्गिकेची लांबी २० किमी असून, त्यावर १८ स्थानके आहेत. सद्य:स्थितीत या मोनो मार्गिकेवरून सुमारे १८ हजार प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. मात्र, त्यातून प्रवाशांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा मार्गिकेच्या संचलनाचा खर्च अधिक आहे. त्यामुळे या मोनो मार्गिका चालविण्याचा भार एमएमआरडीएच्या माथी आला आहे.
निविदा प्रक्रिया सुरू
आता मोनोचा तोटा कमी करण्याच्यादृष्टीने या मार्गावरील तिकीट विक्रीव्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) सुरू केला आहे. मोनो मार्गिकेवरील सर्व स्थानकांवरील नावांच्या हक्कांची विक्री करण्यात येणार आहेत. त्यासाठी एमएमओसीएलने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानकांच्या नावाचे अधिकार प्राप्त करणाऱ्या व्यावसायिकांना स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नावाला ब्रँडचे नाव लावून जाहिरात करता येणार आहे. तसेच स्थानकात चिन्ह, नकाशे लावता येतील.