Join us

‘एमएमआरडीए’ही करणार टोल वसुली, प्रस्ताव शासनाला सादर करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 6:08 AM

वर्सोवा-विरारदरम्यान ४२ किमी लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाच्या सुधारित अंदाजास मान्यता.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत वर्सोवा-विरारदरम्यान ४२ किमी लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाच्या सुधारित अंदाजास मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरिन ड्राइव्ह, सागरी किनारा मार्गाच्या दरम्यान वाहतुकीच्या दळणवळणासाठी ३.८ किमी लांबीच्या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून डिसेंबर, २०२७ पासून टोल वसुली करण्याचे अधिकार प्राप्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्यास प्राधिकरणाला मान्यता दिली आहे.

वांद्रे रेक्लेमेशन, मुंबई येथे ‘मुंबई आय’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तांत्रिक व्यवहार्य पूर्वाभ्यास करणे तसेच प्रकल्प उभारणी करण्याकरिता विकासकाची नेमणूक करण्यास तसेच प्राधिकरणाला प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या प्रकल्पाचा विस्तार खडकपाडापर्यंत टप्पा १ मध्ये आणि उल्हासनगरपर्यंत टप्पा २ मध्ये होणार आहे. 

टॅग्स :टोलनाकाएमएमआरडीए