एमएमआरडीएला बीकेसीतील भूखंड विक्रीतून मिळणार २,३०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 06:02 AM2019-06-17T06:02:51+5:302019-06-17T06:03:01+5:30

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( एमएमआरडीए ) भविष्यात मेट्रोसह विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी आर्थिक ...

MMRDA will get Rs 2,300 crore from sale of land in BKC | एमएमआरडीएला बीकेसीतील भूखंड विक्रीतून मिळणार २,३०० कोटी

एमएमआरडीएला बीकेसीतील भूखंड विक्रीतून मिळणार २,३०० कोटी

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) भविष्यात मेट्रोसह विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उभारावा, या उद्देशाने एमएमआरडीए बीकेसीमधील एका भूखंडाची विक्री करणार आहे. या भूखंडाच्या विक्रीतून प्राधिकरणाला सुमारे २ हजार ३०० कोटींचा महसूल मिळणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या येथील भूखंडाची किंमत गगनाला भिडली आहे. बीकेसीतील जी ब्लॉकमधील १२ हजार ५०० चौरस मीटर भूखंडासाठी २,३०० कोटी रुपये विक्री किंमत ठरविण्यात आली आहे. एमएमआरडीएने बीकेसी जी ब्लॉक येथील ३ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. वारंवार मुदतवाढ देऊनही या भूखंडांसाठी कोणीही पुढे आले नसल्याचा अनुभव यापूर्वी आला होता.

भूखंड विक्रीतूनच भविष्यात हाती घेण्यात आलेल्या १३ मेट्रो मार्गिकेसाठी आर्थिक निधीची सुविधा उपलब्ध करण्याचा पर्याय एमएमआरडीएने राखून ठेवला आहे. आगामी काळात बुलेट ट्रेनसाठीही काही निधीची तरतूद करण्यात येणार आहे. यासह स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो-६ चे काम सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ७१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या विविध मेट्रो प्रकल्प आणि शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पासाठी जपान बँकेकडून, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून, तसेच केंद्राकडून निधी मिळत असून, २०२४ पर्यंत ११ मेट्रो मार्गिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने समोर ठेवले आहे.

विविध प्रकल्पांमुळे परिसराला महत्त्व प्राप्त
बीकेसीमध्ये विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची, वित्तसंस्थांची, बँकांची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये दिवसभर नोकरदार वर्गाची ये-जा सुरू असते. म्हाडाच्या माध्यमातून येथे लवकरच निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मेट्रो-३ मार्गिका, मेट्रो-२ आणि सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला, वांद्रे रेल्वे स्थानके, चुनाभट्टी कनेक्टर अशा विविध प्रकल्पांमुळे या परिसराला महत्त्व आले आहे. येथील जागेच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा फायदा घेत प्राधिकरणाने बीकेसी जी ब्लॉकमधील तीन भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या.

Web Title: MMRDA will get Rs 2,300 crore from sale of land in BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.