मुंबईचा वेग वाढणार; पुढील वर्षी एमएमआरडीए सुरू करणार दोन मेट्रो मार्गिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:46 AM2019-11-02T00:46:04+5:302019-11-02T00:46:43+5:30
एमएमआरडीएमार्फत मुंबई आणि मुंबई लगतच्या भागांमध्ये एकूण १३ मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहेत
मुंबई : पुढील वर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो- २ अ आणि मेट्रो- ७ या दोन मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार आहेत. जुलै ते ऑगस्ट दरम्यान या दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची चाचणी करण्याचा विचार एमएमआरडी करत आहे. यामुळे ही चाचणी पूर्ण होताच २०२० मध्ये मुंबईकरांच्या सेवेमध्ये या मार्गिका दाखल होतील.
एमएमआरडीएमार्फत मुंबई आणि मुंबई लगतच्या भागांमध्ये एकूण १३ मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यापैकी दहिसर पश्चिम ते डीएन नगर ही मेट्रो-२ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो- ७ मार्गिकेचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यावर दररोज १५ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतील. यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी फुटेल.
मेट्रो-२ अ या मेट्रो मार्गिका लिंक रोडवरून जात असून मेट्रो- ७ मार्गिका पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बांधण्यात आली आहे. सध्या या दोन्ही मार्गिकांचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे हे काम पूर्ण करून पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये या मार्गावर मेट्रोची चाचणी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. तसेच ऑक्टोबर २०२० पर्यंत या दोन्ही मार्गिकांचे उद्घाटन करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.