महामार्गावरील पादचारी पुलांंची एमएमआरडीए करणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:57 AM2019-09-21T01:57:31+5:302019-09-21T01:57:35+5:30
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील पादचारी पुलांची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आहे.
मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील पादचारी पुलांची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आहे. यामुळे या मार्गांवरील पादचारी पूल, पादचारी आणि वाहनांसाठी असलेले भुयारी मार्ग यांची दुरुस्ती एमएमआरडीएमार्फत होणार असून यासाठी प्राधिकरणाने २७ लाख रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. तर वांद्रे येथील पादचारी पूल ३१ डिसेंबरपर्यंत खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये दिली होती. यानुसार हा पूल खुला करण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी पूल दुर्घटना घडल्याने सर्वच यंत्रणांच्या अखत्यारीतील पुलांच्या दुरुस्तीचा आणि पुनर्बांधणीचा प्रश्न उपस्थित झाला. विविध यंत्रणांनी त्यांच्या हद्दीतील पुलांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक पादचारी पुलांची अवस्था बिकट आहे़ या दोन्ही महामार्गांवरील काही भाग एमएमआरडीएच्या हद्दीत येतो. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे पादचाऱ्यांसाठी एक भुयारी मार्ग आहे. तर विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर तसेच कांजूरमार्ग येथील पादचारी पुलांचा यामध्ये समावेश आहे. या महामार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी प्राधिकरणाने २७ लाख ५७ हजार ९५७ रुपयांची निविदाही काढली आहे. हे काम वर्षभरात करण्यात येणार आहे.
>वांद्रे पादचारी पूल ३१ डिसेंबरपासून होणार खुला
वांद्रे पूर्व येथील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला असल्याने येथून दररोज प्रवास करणाºया लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा पूल ३१ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने न्यायालयात दिली आहे. व्हीजेटीआय १५ आॅक्टोबरपर्यंत पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करेल आणि १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करेल, असे महापालिकेने न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.