मुंबई : समर्थनगर – जोगेश्वरी – विक्रोळी ( मेट्रो मार्ग – ६) या मार्गिकेच्या प्रणालीचे काम दिल्ली मेट्रो महामंडळाकडून एमएमआरडीएकडे सोपविण्यात आले. त्यामुळे या कामासाठी सर्वसाधारण सल्लागार नियुक्तीमध्ये तब्बल ५७ कोटी रुपयांची बतच झाल्याचा दावा महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी केला आहे. या कामासाठी १२७ कोटी रुपयांऐवजी ७० कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
मेट्रो मार्ग – ६ या प्रकल्पास प्राधिकरणाने १९ आँक्टोबर, २०१६ रोजी मंजूरी दिली होती. तर, मंत्रिमंडळाने त्यावर २१ डिसेंबर, २०१७ रोजी शिक्कामोर्तब करताना ६,७१६ कोटी रुपये खर्चाला परवानगी दिली आहे. सुरवातीला हे संपुर्ण काम दिल्ली मेट्रो रेल महामंडळातर्फे केले जाणार होते. मात्र, आता स्थापत्य कामाची जबाबदारी महामंडळाची असून प्रणालीची कामे एमएमआरडीएकडे सोपविण्यात आली आहेत. त्यात मुख्यत्वे रोलिंग स्टाँक, दूरसंचार, वीज पुरवठा व ट्रँक्शन, ई अँण्ड एम स्टेशन, डेपो, सरकते जीने, लिफ्ट आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठी सर्वसाधारण सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. गुणवत्ता आणि आर्थिक निकषांवर मागविलेल्या या प्रक्रियेत चार सल्लागार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी स्यास्त्र एमव्हीए कन्सल्टिंग या कंपनीची निविदा अंतिम करण्यात आली आहे.
मेट्रो मार्ग आणि डेपोच्या प्रणाली कामांची दैनंदिन देखरेख करणे, कामाच्या निविदा कागदपत्रे, आराखडा आणि त्यांचे मुल्यमापन करण्यासाठी सहाय्य प्रदान करणे तसेच मेट्रो मार्गांची चाचणी आणि प्रणाली सुरू करणे ही जबाबदारी या सल्लागार कंपनीवर असेल. त्यापोटी त्यांना ७० कोटी ८० लाख रुपये मोजले जाणार आहेत. दिल्ली मेट्रो रेल महामंडळाकडे संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी असताना प्रणालीच्या कामाचे अंदाजित मुल्य २ हजार १२४ कोटी रुपये होते. दिल्ली मेट्रो महामंडळ सल्लागारासाठी ६ टक्के फी म्हणजे १२७ कोटी रुपये अदा करणार होती. परंतु, आता हे काम एमएमआरडीएकडे आले असून सल्लागाराला ७० कोटी ४० लाख रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाची ५७ कोटी ४ लाख रुपयांची बतच झाल्याचा दावा महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी महामंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत केला.
------------------------
तांत्रिक गुणांवर पटकावले काम
या प्रक्रियेत ईजीस रेल या कंपनीची निविदा लघुत्तम (६३ कोटी ४२ लाख) इतकी होती. मात्र, तांत्रिक निकषांमध्ये या कंपनीला ६८८९ गुण देण्यात आले होते. तर, निविदा पटकावलेल्या स्यास्त्र कन्सल्टिंगची बोली ९ कोटींनी जास्त असली तरी त्यांना ७२०२ तांत्रिक गुण देण्यात आले. दोन्ही निकषांची बेरीज केल्यानंतर स्यास्त्रला जास्त गुण असल्याचे स्पष्ट करत त्यांना हे काम देण्यात आलेत. तांत्रिक गुणांचा निकष नसता तर आणखी ९ कोटी रुपयांची बतच झाली असती.