एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात महामुंबईतील मेट्रो प्रकल्पांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:09 AM2019-03-01T05:09:21+5:302019-03-01T05:09:31+5:30

१६,९०९ कोटींच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी : सर्वाधिक निधीची १० मेट्रो प्रकल्पांसाठी तरतूद

MMRDA's budget focuses on Metro projects in Greater Mumbai | एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात महामुंबईतील मेट्रो प्रकल्पांवर भर

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात महामुंबईतील मेट्रो प्रकल्पांवर भर

Next

मुंबई : निवडणूक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना गती यावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या १६ हजार ९०९ कोटींच्या अर्थसंकल्पापैकी सर्वाधिक म्हणजे ७ हजार ४८६.५० कोटी रुपयांच्या निधीची महामुंबई परिसरातील विविध १० मेट्रो प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याची चर्चा आहे. एमएमआरडीएचा २०१९-२० चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजूर केला.


मेट्रोचे संचलन करणाऱ्या मेट्रो भवनासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. आरेत मेट्रो भवन उभारण्यात येईल. यामध्ये प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन व नियंत्रण केंद्र, कार्यालये व कॅफिटेरिया व सात रहिवासी मजले असतील. त्यासाठी १०० कोटींची तरतूद आहे.
पारबंदर (ट्रान्सहार्बर) मार्गासाठी ३ हजार कोटी व सूर्या तसेच काळू प्रकल्पासाठी ७०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी २,२५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे इंधन व वेळेची बचत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सूर्या, काळू प्रकल्पासाठी ७०४ कोटी
प्रादेशिक स्तरावर जलस्रोताचा विकास व्हावा यासाठी सूर्र्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेसाठी ७०४.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे ८८ किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे मीरा-भार्इंदर व वसई-विरार महापालिकेसाठी ४०३ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी वसई-विरारला १८५ दशलक्ष लीटर व मीरा-भार्इंदर महापालिकेला २१८ दशलक्ष लीटर पाणी मिळेल. या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा वापर केला जाणार नसून त्याऐवजी गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करण्यात येईल.

मोनोचा दुसरा टप्पा लवकरच
१८.२८ किमी लांबीचा मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौकपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ८०० कोटी (भूसंपादनासह), मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणासाठी १४३ कोटी रुपये, सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्याचे कु र्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण व वांद्रे कुर्ला संकुल ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर पूर्व येथे उन्नत मार्ग सुधारणा करण्यासाठी ७५ कोटी, कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पायाभूत सुविधा ही काळाची गरज
उज्ज्वल भविष्यासाठी मेट्रो अनिवार्य असून थोर नेत्यांची मार्गदर्शक तत्त्वेही आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेत. पायाभूत सुविधा ही काळाची गरज असून स्मारके आपल्याला इतिहासाशी व जमिनीशी जोडून ठेवण्याचे काम करतात. भूतकाळ, वर्तमान, भविष्य व पर्यावरण या चार गोष्टी आपल्याला संपूर्ण विकासाकडे घेऊन जाऊ शकतात.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष.

Web Title: MMRDA's budget focuses on Metro projects in Greater Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.