MMRDA चा भूखंड धारावी प्रकल्पासाठी?; २००० चौरस मीटरचा भूखंड देण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:02 AM2024-07-06T11:02:18+5:302024-07-06T11:02:37+5:30
धारावीतील सेक्टर ५ मध्ये धारावी बस डेपोजवळ एच ब्लॉकमध्ये एमएमआरडीएच्या मालकीचा भूखंड आहे
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मालकीचा धारावीतील सेक्टर ५ मधील २००० चौरस मीटरचा भूखंड धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) देण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून केला जात आहे. भारतातील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असेल. या भागात विविध सरकारी प्राधिकरणांची जमीन आहे. या जमिनीचीही पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यकता आहे. त्यामध्ये रेल्वेच्या मालकीच्या सुमारे ४५ एकर जागेचा समावेश आहे. त्यातील २७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच अन्य प्राधिकरणांच्या भूखंडांची चर्चा सुरू आहे.
त्यात धारावीतील सेक्टर ५ मध्ये धारावी बस डेपोजवळ एच ब्लॉकमध्ये एमएमआरडीएच्या मालकीचा भूखंड आहे. डीआरपीकडून पुनर्विकास प्रकल्पासाठी या भूखंडाची मागणी करण्यात आली होती. हा भूखंड हस्तांतरित करण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वादंग उठले आहे. धारावीतील अपात्र लोकांना धारावीबाहेर स्थलांतरित करण्यास मोठा विरोध होत आहे. मुलुंड येथे आणि कुर्ला डेअरीच्या जागेवर या प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण करण्याबाबत चर्चा सुरू आहेत, मात्र मुलुंड आणि कुर्ला येथील स्थानिक रहिवाशांनी धारावीतील लोकांच्या त्या भागातील स्थलांतरणाला विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे धारावीतील लोकांच्या स्थलांतरणाचा प्रश्न बिकट झाला आहे.