सेवा कराच्या वाढीमुळे मुंबईकर नाराज
By admin | Published: March 1, 2015 12:50 AM2015-03-01T00:50:17+5:302015-03-01T00:50:17+5:30
शनिवारी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण या अर्थसंकल्पामुळे सामान्य मुंबईकर निराश झाला आहे. सेवा करात झालेल्या वाढीमुळे प्रत्येक गोष्ट महागणार आहे.
टीम लोकमत : मुंबई
शनिवारी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण या अर्थसंकल्पामुळे सामान्य मुंबईकर निराश झाला आहे. सेवा करात झालेल्या वाढीमुळे प्रत्येक गोष्ट महागणार आहे. शिवाय आयकर मर्यादेतही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असे सांगत मुंबईकरांनी फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली आहे. नाराज मुंबईकरांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...
बजेट पाहून घोर निराशा
या सरकारकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. काही तरी बदल घडेल, अशी आशा होती. मात्र बजेट पाहून घोर निराशा झाली आहे. यामुळे महिला वर्गावर कुटुंबीयांचा अधिक बोजा येणार आहे.
- विजया बडेकर, गृहिणी
शिक्षणाबाबत तरतूद नाही
देशाचे भवितव्य घडवण्यासाठी मोदी सरकार तत्पर आहे, अशी घोषणा गेले काही दिवस वारंवार केली जात होती़ मात्र शिक्षणासाठी बजेटमध्ये त्याचा काहीही उल्लेख नाही किंवा तशी तरतूदही नाही़
- श्रुती जाधव, विद्यार्थिनी
ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे
यंदाचे बजेट ज्येष्ठ नागरिकांच्या नक्कीच हिताचे म्हणावे लागेल. सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा लागू केला आहे. समाजातील वंचित घटकांना आरोग्य सुविधांचा लाभ
- प्रकाश बोरगावकर, संचालक, हेल्प एज इंडिया
सर्वसामान्यांची फसवणूक
जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ करदात्या वर्गाच्या हिताचा विचार करणारा संकल्प असून, कॉर्पोरेट क्षेत्राचा विकास म्हणजे देशाचा विकास या कल्पनेवर आधारित आहे़ जेटली यांच्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य शहरी माणसाचा विचार करण्यात आलेला नाही़ प्रत्यक्ष करातील कपातीचा फायदा करदात्या वर्गालाच मिळणार आहे़ मात्र अप्रत्यक्ष करातील वाढीचा फटका सामान्यांनाच बसेल.
- प्रभाकर नारकर,
जनता दल सेक्युलर, अध्यक्ष, मुंबई
सुविधांच्या विस्तारासाठी काही नाही
देशातील दळणवळण अधिक विस्तारित होईल, असे नवीन या बजेटमध्ये काहीच नाही़ शहर व गावे जोडणारे रस्ते चांगले असतील तर देवाणघेवाण अधिक लवकर होईल़ बाजारपेठेत वस्तू लवकर पोहोचल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही़ मात्र हे मुद्दे बजेटमध्ये नाहीत़
- अदिश्री सहस्रबुद्धे, विद्यार्थिनी
परिस्थिती जैसे थे!
व्यावसायिक कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी केला. व्यावसायिकांच्या दृष्टीने ही बाब चांगली आहे; पण सेवाकर वाढवण्यात आला आहे. यामुळे ग्राहक खरेदी करताना, सेवा घेताना नक्कीच विचार करणार. मेक इन इंडियाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आले. अर्थसंकल्पात ३१० कोटींच्या तरतुदी केली आहे.
- राहुल बोरुडे, व्यावसायिक
अजून तरतुदी आवश्यक होत्या
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही तरतुदी चांगल्या केल्या आहेत. विम्यासाठी केलेल्या तरतुदी चांगल्या आहेत. विम्याचे कवच ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. यामुळे त्यांना फायदा होईल. पण इतर कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत अथवा योजनांची घोषणा झालेली नाही.
- काका सामंत, सचिव, जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स इंडिया फेडरेशन
दाखवलेली स्वप्ने फोल ठरली
हे बजेट सर्वसामन्यांसाठी नाहीच. निवडणुकीपूर्वी या सरकारने जी स्वप्ने सामान्य जनतेला दाखवली होती, ती पूर्णपणे फोल ठरली असून सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे.
- सुभाष मराठे, अध्यक्ष, घरेलू कामगार महिला समिती
चैनीच्या गोष्टी, सेवा महागणार
दरडोई उत्पन्न वाढत असल्यामुळे पैसा एका ठिकाणी न राहता चलनात होता. त्यामुळे आयकर मर्यादेत सूट द्यायला हवी होती, पण ती दिलेली नाही. या अर्थसंकल्पानंतर चैनीच्या गोष्टी, सेवा महाग झाल्या आहेत. यामुळे खर्च करताना ग्राहक नक्कीच विचार करावा लागेल.
- समीप परब, नोकरदार
आयकर मर्यादेत वाढ हवी होती
उद्योजकांबरोबरच नोकरदार वर्गालासुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय आयकर मर्यादा वाढवायला हवी होती.
- प्रकाश मिमरोट, अभियंता, एल अॅण्ड टी, मुंबई
सर्वच वस्तूंच्या किमती वाढणार
मोदी सरकारचे हे पहिले बजेट असल्याने वस्तूंच्या किमती कमी होणे अपेक्षित होते़ मात्र येथे उलट वस्तूंच्या किमती वाढणार आहेत़ तेव्हा हे बजेट निराशाजनकच आहे़
- समीर पवार, नोकरदार