Join us

मनसेतून शिवसेनेत गेलेले 6 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 4:51 PM

मनसेची साथ सोडून शिवसेनेत गेलेले 6 नगरसेवक मुंबई मनपाच्या सभागृहात अनुपस्थित राहिले आहेत. मनसेकडून एकमेव नगरसेवक संजय तुर्डे उपस्थित राहिले.

मुंबई - मनसेची साथ सोडून शिवसेनेत गेलेले 6 नगरसेवक मुंबई मनपाच्या सभागृहात अनुपस्थित राहिले आहेत. मनसेकडून एकमेव नगरसेवक संजय तुर्डे उपस्थित राहिले.  मनसेने पक्षाच्या नगरसेवकांसाठी आज सकाळी व्हीप जारी केला होता. महापालिका किंवा समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्षांकडून पुढील सुचना मिळेपर्यंत मतदान करु नये, असे व्हीपमध्ये म्हटलंय. पक्ष सोडून शिवसेनेत गेलेले हे नगरसेवक नेमके कोणासोबत आहेत ते आज स्पष्ट होणार होतं. 

शिवसेनेत गेलेल्या सहापैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत प्रवेश करणार असल्याची काल चर्चा सुरु होती. परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव या चार नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काल संध्याकाळी शिवसेनेकडून परिपत्रक प्रसिद्ध करुन या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. मनसेतून आलेले नगरसेवक आपल्यासोबतच असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. 

शिवसेनेत आल्याचा पश्चाताप नाही, उलट मनसेत पश्चाताप होत होता -  दिलीप लांडेमनसेने काढलेल्या व्हीपचं पत्र माझ्याकडे आलेलं नाही आणि या व्हीपला अर्थ नाही. कोणी कुठं बसावं याबद्दल असं काही नाही, कोणीही कुठं बसू शकतो, असे दिलीप लांडे म्हणाले. शिवाय,  शिवसेनेत आल्याचा पश्चाताप नाही, उलट मनसेत पश्चाताप होत होता. म्हणून पक्ष सोडला आणि इकडे आलो. असे सांगत दिलीप लांडेंनी त्यांच्या सेनाप्रवेशावर भाष्य केले.  काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे. मी हत्तीची चाल चालत राहीन, असं उत्तर मनसेमधून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी त्यांच्या टीकाकारांना दिलं आहे. मनसेचे जे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले, त्यांच्यापैकी एक दिलीप लांडे आहेत.

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जातं आहे. शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती. तसंच  संजय तुर्डे यांनीही आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यावरुन आता परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची चिन्हं आहेत.

मनसेने जारी केला व्हीप आज होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीआधी मनसेकडून व्हीप जारी करण्यात आला. पक्षाच्या सूचनेशिवाय महापालिका सभागृहात मतदान करु नये. कोणी मतदान केल्यास कारवाई केली जाईल असे या व्हीपमध्ये म्हटले आहे. नेमके हे नगरसेवक कोणासोबत आहेत ते आज स्पष्ट होईल.  

अफवांवर विश्वास ठेवू नका, सहाही नगरसेवक आमच्यासोबतच - शिवसेनामनसेतून शिवसेनेत गेलेले लांढे यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं असून त्यावर सहाही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये आम्ही खाली सह्या करणारे सहाही नगरसेवक शिवसनेत आहोत. आणि शिवसेनेतच राहणार. अफवावर विश्वास ठेवू नका असे जाहीर करण्यात आलं आहे. आमची बदनामी करण्याचे षडयंत्र कोणीतरी करत असल्याचा आरोपही या सहा नगरसेवकांनी केला आहे. 

सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनामनसे