लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. मनसेने यापूर्वी ७, तर मंगळवारी ४५ अशी एकूण ५२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात मुंबईतील १६ उमेदवारांचा समावेश आहे. मनसेचा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात प्रभाव असला तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी उमेदवार दिले आहेत.
खडकवासलामधून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयूरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे; तर मुलगा अमित ठाकरे याला माहीम मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. या दोघांशिवाय बाळा नांदगावकर (शिवडी) आणि वरळीत आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील संदीप देशपांडे या प्रमुख उमेदवारांच्या लढती लक्षवेधी राहतील. मयूरी म्हस्के (गेवराई) आणि संगीता चेंदवणकर (मुरबाड) या दोन महिलांनाही उमेदवारी दिली आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांपैकी ११ जणांना पुन्हा संधी दिली आहे. १८ ठिकाणी पक्षाने नवे चेहरे, तर २१ नवीन मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, बोरिवली, चारकोप, विदर्भातील नागपूर दक्षिण, चंद्रपूर, तसेच पंढरपूर, श्रीगोंदा आणि मराठवाड्यातील हिंगोली, औसा यांचा समावेश आहे.
अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघच का?
दादरच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी वास्तव्य असणाऱ्या अमित ठाकरे यांनी येथूनच निवडणूक लढवावी, असा अहवाल पक्षनिरीक्षकांनी दिला होता. येथील ‘राजगड’ पक्षकार्यालयातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. गेल्या निवडणुकीत पक्षाला येथून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळेच हा सुरक्षित मतदारसंघ त्यांना दिला आहे.
वरळी, शिवडी राखणार का?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडी मतदारसंघातून २००९ मध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी दोन वेळा मुंबई दक्षिणमधून लोकसभा लढविली. मात्र, ते पराभूत झाले होते. आता ते विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरले आहेत. तर, वरळी मतदारसंघामध्ये संदीप देशपांडे यांनी वरळी व्हिजन मांडत प्रचारात रंगत आणली आहे. वरळीत उद्धवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसेचे उमेदवार निवडून येणार का अशी चर्चा आहे.
आतापर्यंतचे आमदार
वर्ष लढलेल्या जागा विजयी २००९ २८८ १३ २०१४ १४३ १२०१९ १०१ १