राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 09:22 AM2022-07-19T09:22:24+5:302022-07-19T09:23:45+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे रणनीती आखत आहेत. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे.
मुंबई - राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत आता मनसेही सक्रीय झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहे. अलीकडेच राज यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांती घेऊन मनसे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे घेणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे रणनीती आखत आहेत. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. राज ठाकरे बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेतली होती. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात केली आहे. वार्ड रचनेबाबत आणि इच्छुक उमेदवारांचीही राज ठाकरे संवाद साधणार आहेत.
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली होती. जवळपास या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये २ तास वैयक्तिक चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आले असले तरी राज्यातील राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर मनसे-भाजपा एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले.
मनसे सरकारमध्ये सहभागी होणार?
राज-फडणवीस भेटीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले होते की, सरकारमध्ये समावेश असण्याचा आमचा संबंध नाही. आम्ही तशी काही मागणी केली नाही. पण दोघांमध्ये चर्चा झाली असेल तर माहिती नाही. राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मनसे-भाजपा युतीबाबत अनुत्तरीत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे भाष्य करू शकत नाही. भाजपाला मदत करण्याची भूमिका मनसेने घेतली. आता त्याबदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचं धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उद्याही राहणार आहेत. पण भविष्यात नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही असंही नांदगावकरांनी सांगितले होते.