ठाणे-कल्याण स्टेशनजवळ मनसेचं खळ्ळ खटॅक, कार्यकर्त्यांनी केली स्टॉल्सची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 10:18 AM2017-10-21T10:18:36+5:302017-10-21T12:17:51+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. राज ठाकरेंची ही मुदत शुक्रवारी संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने आंदोलन केलं आहे
ठाणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. राज ठाकरेंची ही मुदत शुक्रवारी संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने आंदोलन केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे.
ठाणे स्टेशनच्या आवारात असणाऱ्या छोट्या टपऱ्या, सरबताचे स्टॉल्स मनसे कार्यकर्त्यांनी तोडले. सकाळी मनसेचे कार्यकर्ते आले आणि त्यांना काहीही न बोलता तोडफोड केल्याचं एका स्टॉल धारकाने सांगितलं. पंधरा दिवसात स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा नाहीतर सोळाव्या दिवशी मनसेकडून फेरीवाल्यांना हटवलं जाईल, असं अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिलं होतं. हे अल्टीमेटम संपल्यानंतर आज सकाळपासून मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाले हटवायला सुरूवात केली. ठाण्यामध्ये मनसेकडून झालेलं आंदोलन मुंबईतील इतर ठिकाणीही होण्याची चिन्ह आहेत.
पंधरा दिवसांचं अल्टीमेटम संपलं
एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन शुक्रवारी संपली आहे. त्यामुळे राज ठाकरे यापुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे कार्यालया आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं.
15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. 15 दिवसात तसं न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असंही राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं. भाषणात राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
कल्याणमध्येही मनसे कार्यकर्त्यांचं आदोलन
ठाण्याबरोबरच कल्याणमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कल्याण स्टेशनबाहेर मनसेचा राडा शनिवारी सकाळी पाहायला मिळाला. स्टेशनबाहेर असणाऱ्या फेरीवाल्यांचं सामान मनसे कार्यकर्त्यांनी फेकलं. तर डोंबिवलीमध्ये आज सकाळी फेरीवाले बसलेच नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.