Video: 'आरे'तील वृक्षतोडीविरोधात मनसेचे युवराज सरसावले; अमित ठाकरेंनी केलं मुंबईकरांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 08:23 AM2019-09-04T08:23:09+5:302019-09-04T08:30:22+5:30
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता
मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यासाठी मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत मनसेने मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी स्थानिक 82 हजार लोकांनी तक्रारी दिलेल्या असताना मुंबई वृक्ष प्राधिकरणाने आरेतील वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी यामध्ये काही शंका उपस्थित होते असा आरोप केला आहे. अमित ठाकरेंनी SaveAarey या कॅप्शनद्वारे सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला नको अशी भूमिका मांडली आहे.
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता असं असतानाही झाडे तोडण्याचा निर्णय घेतला जात असेल तर नक्कीच यात संशय निर्माण होण्यासारखं आहे. निसर्गाचा बळी देऊन विकास नको. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचे संकट फक्त मुंबई, महाराष्ट्र नव्हे जगावर आहे. एकीकडे अॅमेझॉन जंगलाला मोठी आग लागली यातून प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. हे सर्व होत असताना आपण मुंबईचा श्वास असणारे आरे नष्ट करायला निघालो आहोत अशी खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली.
तसेच आरेतील वृक्षतोडीविरोधात सर्व मुंबईकरांनी एकत्र यावं, या गोष्टीवर व्यक्त व्हा, मी तुमच्या सोबत आहे, मी निसर्गासोबत आहे असं म्हणत अमित ठाकरेंनी मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि संस्थांनी आरेत मानवी साखळी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा विरोध केला होता. त्यामुळे आगामी काळात आरे जंगल वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता आहे.