Join us

शिंदे गटातील आमदाराविरोधात मनसे आक्रमक; जनतेला जर त्रास देणार असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:43 PM

तुम्ही मनसेला साद घातली तर या उन्मत्त आमदारासमोर मनसे उभी असेल असं सांगत प्रकाश सुर्वेविरोधात मनसेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठणेत केलेल्या चिथावणीखोर विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आमदार सुर्वे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना आक्रमक भाषा करत तंगडी तोडण्याचं विधान केले होते. त्याविरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते नयन कदम यांच्या नेतृत्वात आमदार प्रकाश सुर्वेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

नयन कदम म्हणाले आहेत की, एका सार्वजनिक कार्यक्रमात, व्यासपीठावरील जाहीर भाषणात सामान्य जनतेला धमकवणाऱ्या आमदार प्रकाश सूर्वेचा जाहीर निषेध आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे हात पाय तोडा, टेबल जामीन करून देतो, प्रकाश सुर्वे बसला आहे, कोथळा काढा" अशी भाषा करणाऱ्या आमदार प्रकाश सुर्वे विरोधात दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच मागाठणेच्या जनेतेने या गुंडगिरीला घाबरु नये. जनतेला जर त्रास देणार असेल आणि अशी भाषा करणार असेल तर मनसे खंबीर आहे. तुम्ही मनसेला साद घातली तर या उन्मत्त आमदारासमोर मनसे उभी असेल. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न आहे, अशा आमदाराला घेऊन सरकार चालवणार आहात का? महाराष्ट्रातील तरुणांना गुन्हेगारी विश्वात ढकलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का? महाराष्ट्रात गुन्हेगारी राजवट लागू करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल मनसे नेते नयन कदम यांनी व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले होते प्रकाश सुर्वे?आपण गाफील राहायचं नाही. कुणाची दादागिरी खपवून घ्यायची नाही. यांना यांची जागा दाखवून द्यायची. कुणी आरे केले तर त्याला कारे करा, ठोकून काढा. प्रकाश सुर्वे इथे बसलाय. ठोकून काढा. हात नाही तोडला तरी तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करून देतो. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण आमच्या अंगावर आला तर कोथळा फाडल्याशिवाय सोडणार नाही असं चिथावणीखोर विधान आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले होते.  शिवसेनेचीही तक्रारसुर्वे यांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दहिसरच्या कोकणीपाडा बुद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधून चिथावणीखोर व प्रक्षोभक भाषण केल्याचा तक्रारदार व शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांचा आरोप आहे. पाटेकर यांनी त्या कार्यक्रमाची फेसबुक लाइव्ह लिंकदेखील शेअर केली आहे. शशांक पांडे या फेसबुक अकाउंटवरून ते लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. याबाबत पाटेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

टॅग्स :प्रकाश सुर्वेमनसेएकनाथ शिंदे