‘पे अॅण्ड पार्क’विरोधात मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:04 AM2018-05-11T07:04:49+5:302018-05-11T07:04:49+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या सशुल्क वाहनतळ (‘पे अॅण्ड पार्क’) धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या महिन्याभरात हे धोरण रद्द केले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभागप्रमुख विजय लिपारे यांनी दिला आहे.
- चेतन ननावरे
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या सशुल्क वाहनतळ (‘पे अॅण्ड पार्क’) धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या महिन्याभरात हे धोरण रद्द केले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभागप्रमुख विजय लिपारे यांनी दिला आहे. याशिवाय जून महिन्यापर्यंत महापालिकेने धोरण रद्द केले नाही, तर मनसे उच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, अशी माहितीही लिपारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
लिपारे म्हणाले की, सुरुवातीला महापालिकेने ‘ए’ प्रभागात ‘पे अॅण्ड पार्क’चे धोरण राबवले. त्यानंतर हळूहळू मुंबईभर हे धोरण राबवण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यानुसार महापालिकेच्या ‘ई’ प्रभागातील भायखळा पूर्वेकडील ई.एस. पाटणवाला मार्ग, बकरी अड्डा येथील ना.म. जोशी मार्ग या ठिकाणी पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात आले आहे. गिरणगाव परिसरात असलेल्या या दोन्ही ठिकाणी महापालिका कर्मचारी वसाहत, महापालिका शाळा आणि मोठ्या संख्येने चाकरमान्यांची वस्ती आहे. येथील जुन्या बैठ्या चाळी आणि म्हाडाच्या इमारतींमध्ये अद्याप वाहनतळांची व्यवस्था नाही. टॅक्सीचालक आणि माल वाहतूक करणारे चालक याच मार्गांवर रात्रीच्या वेळेस पूर्वापारपासून गाड्या पार्क करत आहेत. परिणामी, येथील चालकांकडे या ठिकाणी गाड्या पार्क करण्यावाचून दुसरे गत्यंतर नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे याठिकाणी गाड्या पार्क करण्यासाठी महापालिका चालकांकडून ‘ए वर्गा’चे शुल्क आकारणार आहे. जे टॅक्सीचालक किंवा माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व मालकांना परवडणारे नाही. मुळात दिवसा या मार्गावर अपवादात्मक परिस्थितीत वाहन पार्क केले जातात. पोट भरण्यासाठी दिवसभर टॅक्सी आणि मालवाहतूक गाडी चालवून चालक या मार्गावर रात्री गाड्या पार्क करतात. त्यासाठी शुल्क भरण्यास चालक तयार नाहीत. त्यामुळे ही आकारणी रद्द करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. या प्रकरणी ते न्यायालयात दाखल करणार असलेल्या याचिकेचे काम त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजन शिरोडकर पाहणार असल्याचे समजते.
इतके दर कसे परवडणार? : महापालिकेने ई.एस. पाटणवाला मार्गाचा समावेश ‘ए वर्गा’त केला आहे. त्यानुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडून आकारण्यात येणारे दर खालीलप्रमाणे...
दुचाकी पार्किंगसाठी
पहिल्या तासासाठी - १८ रुपये
१ ते ३ तास - ५३ रुपये
३ ते ६ तास - ७१ रुपये
६ ते १२ तास - ८९ रुपये
१२ तासानंतर - १०६ रुपये
सकाळी ८ ते रात्री ८ (महिनाभर) - १ हजार ९४७ रुपये
रात्री ८ ते सकाळी ८
(महिनाभर) - ९७४ रुपये
तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी
पहिल्या तासासाठी - ७१ रुपये
१ ते ३ तास - ८९ रुपये
३ ते ६ तास - १२४ रुपये
६ ते १२ तास - २१३ रुपये
१२ तासानंतर - २४८ रुपये
सकाळी ८ ते रात्री ८
(महिनाभर) - ४ हजार ६७३
रात्री ८ ते सकाळी ८
(महिनाभर) - २ हजार ३३६