वरळीत रंगले खड्डे युद्ध; मनसेचे आंदोलन, शिवसेनेचे उदघाटन, राजकारण तापण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:36 PM2021-10-14T23:36:23+5:302021-10-14T23:43:40+5:30
निवडणुकीत खड्डे वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा बार उडविण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळीतूनच दोन रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला गुरुवारपासून सुरवात करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्डे प्रतिकात्मकरित्या विकण्यास काढले. यामुळे निवडणुकीत खड्डे वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
मनसेकडून खड्ड्यांची विक्री....
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यात रस्त्यांची कामंही लांबणीवर पडल्यामुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. हाच मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला आहे. भाजप पाठोपाठ आता खड्ड्यांच्या समस्येकडे मनसेने मुंबईकरांचे लक्ष वेधले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मनसेने महापालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरात खड्ड्यांचा 'सेल' लावला होता. मनसे नेते योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील खड्ड्यांची प्रतिकात्मक विक्री करण्यात येत होती. आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील खड्डे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विभागातील खड्डे ५० टक्के सवलतीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दरवर्षी दसऱ्यानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या वस्तू विकत असतात. त्याचप्रकारे आम्हीदेखील मुंबईतील खड्डे विकायला आणले असल्याचे मनसेने सांगितले.
रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू.....
दरम्यान, वरळी येथील डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्ग आणि डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते जगन्नाथ भातणकर मार्ग या दोन रस्त्यांचा काँक्रिटीकरण्याच्या कामाला गुरुवारपासून सुरवात करण्यात आली. डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्ग या रस्त्याची लांबी ४२० मीटर असून १२.२० मीटर रूंदीच्या होणाऱ्या या रस्त्यामुळे दळणवळण सुधारण्यास तसेच आजूबाजूला असणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवरील रहदारी कमी होण्यास मदत होईल.
डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते जगन्नाथ भातणकर मार्ग या रस्त्याची लांबी सुमारे १.६ किलोमीटर आहे. २२.८० मीटर रूंदीच्या या रस्त्यामुळे लोअर परळ तसेच प्रभादेवी या भागातील रहदारी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर हिंदमातापासून वरळी कोळीवाड्यापर्यंत जाणाऱ्या टेक्सटाईल मील नाल्याचे कामगार नगर येथे रूंदीकरण, पुर्नरेखांकन करणे व संरक्षण भिंत बांधणे या कामालाही सुरुवात करण्यात आली.