Join us

त्या फायर आजींचे मनसेनेही मानले आभार, उद्धव ठाकरेंना लगावला खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 9:53 AM

MNS Criticize Uddhav Thackeray: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले की, त्या आजींचा सत्कार केला पाहिले. त्यांच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री घराबाहेर पडले. धन्यवाद आजी

मुंबई - मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणारे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा यांना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जमले होते. दरम्यान, या शिवसैनिकामध्ये एका ८० वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते. झुकेगा नही म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. तसेच त्यांनी सहकुटुंब जात या आजींची भेट घेतली होती. या भेटीवरून आता मनसेनेही त्या आजींचे आभार मानले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले की, त्या आजींचा सत्कार केला पाहिले. त्यांच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री घराबाहेर पडले. धन्यवाद आजी, अशा शब्दातील ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीबाहेर जमले होते. यामध्ये ८० वर्षांच्या एका आजींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री ठाकरेंनी काल संध्याकाळी या आजींची भेट घेतली. आजींच्या भेटीसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब परळच्या त्यांच्या घरी गेलं.

उद्धव ठाकरे आज आमच्या घरी आले. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यामुळे आनंद झाल्याची भावना आजी चंद्रभागा शिंदेंनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचं आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या. आजींसारखे शिवसैनिक हाच मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. 'माणसाचं वय कितीही वाढलं, तरी तो मनानं तरुण हवा, असं बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढलं आहे. पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत,' अशा शब्दांत ठाकरेंनी आजींचं कौतुक केलं. मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या, असं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामनसेसंदीप देशपांडे