Join us  

मनविसेत खांदेपालट! नव्या चेहऱ्यांना संधी, दुसऱ्या फळीतील नेत्यांना अमित ठाकरेंनी पुढे आणलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 6:31 PM

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असून पहिल्याच टप्प्यात त्यांनी मनविसेचे ७ विभाग अध्यक्ष बदलले आहेत. नव्या विभाग अध्यक्ष पैकी बहुतेक जण हे मनविसेच्या दुसऱ्या फळीत होते, तर काही नवीन चेहऱ्यांनाही अमित यांनी पुढे आणलं आहे. काही निवडक ठिकाणी मात्र त्यांनी जुनेच विभाग अध्यक्ष कायम ठेवले आहेत.

गेल्या ७ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेटी देऊन मनविसेचे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत, त्यांच्याशी थेट बोलत आहेत. या १५ विधानसभेतील मनविसेच्या १५ विभाग अध्यक्षपैकी ७ विभाग अध्यक्ष त्यांनी बदलले आहेत, ३ विभाग अध्यक्ष आधीचे कायम ठेवले आहेत, तर उर्वरित ५ विधानसभासाठीच्या नेमणुका पुढच्या आठवड्यात करणार आहेत. 

मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईच्या सर्वच्या सर्व म्हणजे ३६ विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात त्यांना किमान २०० नवतरुण विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत असून आतापर्यंत त्यांनी सुमारे ३००० हजार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक तसंच गटागटाने संवाद साधला आहे. 

अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे. नव्या दमाच्या तरुणांना मनविसेत महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते नव्या ऊर्जेने कामाला लागले आहेत.

मनविसेचे  मुंबईतील नवीन चेहरे - नवीन विभाग अध्यक्ष :

वरळी - वैभव मांजरेकर विभाग अध्यक्ष

मानखुर्द - प्रकाश हंगारगे विभाग अध्यक्ष 

घाटकोपर पूर्व - रोहन अवघडे विभाग अध्यक्ष

घाटकोपर पश्चिम - समीर सावंत विभाग अध्यक्ष

विक्रोळी - प्रथमेश धुरी विभाग अध्यक्ष

मुलुंड - प्रवीण राऊत विभाग अध्यक्ष

भांडूप- प्रतीक वंजारे विभाग अध्यक्ष

आधीचे, पण नव्या यादीतही कायम असलेले मनविसेचे विभाग अध्यक्ष :

वडाळा - ओमकार बोरकर विभाग अध्यक्ष, मीनल सोनावणे विभाग अध्यक्ष (विद्यार्थिनी)

शिवडी - उजाला यादव विभाग अध्यक्ष

माहीम - अभिषेक पाटील विभाग अध्यक्ष

टॅग्स :अमित ठाकरेमनसे