अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:38 AM2022-06-15T10:38:33+5:302022-06-15T10:48:52+5:30
मनविसेच्या पुनर्बांधणी संपर्क अभियानातून आतापर्यंत २५००हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. त्यानंतर आता अमित ठाकरेंनी मुंबईत 'मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान' हाती घेतलं आहे. गेल्या ५ दिवसांत अमित यांनी शिवडी, वरळी, कुलाबा, मलबार हिल, माहीम, वडाळा, मानखुर्द, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, मुलुंड, भांडूप, धारावी या १३ विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांत युवक-युवतींशी संवाद साधला.
अमित ठाकरे(MNS Amit Thackeray) यांना भेटण्यासाठी प्रत्येक विभागात तरूणांची गर्दी होत अनेकजण मनविसेत सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनविसेच्या या मोर्चेबांधणीमुळे आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे अमित ठाकरेंचे मिशन मुंबई सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान असले तरी प्रत्यक्षात मुंबई महापालिका निवडणुकीची अप्रत्यक्ष तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. अमित ठाकरे जातात तिथे मनसे पदाधिकाऱ्यांचे बॅनर्स, मनसेचे झेंडे, ढोल ताशा पथकं यांतून मनसेची जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे.
या संपर्क अभियानाबाबत मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी सांगितले की, विधानसभा मतदारसघांतील शेकडो विद्यार्थी, तरुणांनी अमित ठाकरे यांच्याशी 'व्यक्तिशः संवाद' साधायला प्रचंड गर्दी केली होती. कार्यालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अमित ठाकरेंना भेटण्यासाठी अनेक तरूण उत्सुक आहेत. विद्यार्थिनींची, युवतींची संख्या युवकांइतकीच होती, हा तर सर्वांसाठी सुखद धक्काच होता. अनेक अमराठी मुलं मुलीही आले होते, इंग्रजीत संवाद साधत होते असंही त्यांनी म्हटलं.
तसेच या अभियानामुळे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना एका वेगळ्याच उंचीवर जाणार आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि अत्यंत प्रभावी विद्यार्थी संघटना बनणार आहे हे निश्चित झालं. संवाद बैठकीसाठी आलेल्या प्रत्येकाने काही वैयक्तिक तसंच अनेक शैक्षणिक समस्या मांडल्या. अपुऱ्या रोजगार संधीचा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला अशीही माहिती किर्तीकुमार शिंदे यांनी दिली.
किती वेळ चालते अमित ठाकरेंची संवाद बैठक ?
प्रत्येक विभागात अमित ठाकरे विद्यार्थी विद्यार्थिनीशी किमान दीड ते दोन तास संवाद साधतात. व्यक्तिशः आणि गटागटाने विद्यार्थी अमित यांना भेटतात बोलतात. मनविसेच्या जुन्या तसंच विद्यमान पदाधिकाऱ्यांशीही अमित बोलतात. मनविसे पदाधिकारी त्यांचा कार्य अहवाल अमित यांना सादर करतात.
विद्यार्थी अमित ठाकरेंना काय सांगतात?
झोपडपट्टी तसंच बैठ्या चाळींमध्ये राहणारे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या शैक्षणिक समस्या सांगत आहेत. महाविद्यालय फी परवडत नसल्याचे तसंच प्रवेश मिळवताना येणाऱ्या अडचणी यांबाबत ते बोलत आहेत. मनविसेत सक्रिय काम करण्याची इच्छा हजारो तरुण अमित ठाकरेंशी संवाद साधल्यानंतर व्यक्त करत आहेत. पदाधिकारी बनण्यासाठी प्रत्येकजण फॉर्म भरत आहे.