राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 10:40 AM2023-07-09T10:40:30+5:302023-07-09T10:41:50+5:30
आम्ही राजकीय चिखलात नाही, याचा अभिमान आहे, असे सांगत हे बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले.
MNS Amit Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. यासंदर्भात आता राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
लोकांनी आता संताप व्यक्त करण्याचे गरजेचे आहे. मुलगा म्हणून अभिमान आहे की, आता जो राजकारणाचा चिखल झाला आहे, त्यात आम्ही नाही. एका आमदाराचे आम्ही १०० आमदार करू शकतो. पण या चिखलातून बाहेर कसे येणार, असा थेट सवाल करत, दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणे गरजेचे आहे. ते म्हणजे राज ठाकरे, असे अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे?
मीडियाशी बोलताना अमित ठाकरे यांना राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, असे विचारले असता, अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे सत्तेत आले पाहिजेत. इतर कुणी नाही. आम्ही या राजकीय चिखलात नाही. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. राज ठाकरेंनी आम्हाला येथेपर्यंत पोहचवले आहे. यापुढील निर्णयही राज ठाकरेच घेतील, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे दौरे सुरू होत आहेत. माझाही आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा आहे. आम्ही शांततेत पक्ष बांधत आहोत, लोकांपर्यंत पोहोचत आहोत. याचा रिझल्ट तुम्हाला पुढील वर्षी निवडणुकांत दिसेल, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.