“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 02:38 PM2024-06-21T14:38:47+5:302024-06-21T14:39:57+5:30

Amit Thackeray Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी केलेला विनोद समजायलाच १० मिनिटे लागली. राज ठाकरेंनी दिलेला पाठिंबा विसरता कामा नये, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

mns amit thackeray replied uddhav thackeray over criticism on raj thackeray | “वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

Amit Thackeray Replied Uddhav Thackeray: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने दणक्यात वर्धापनदिन साजरा केला. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी थेट शब्दांत उत्तर दिले. 

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरून वर्धापनदिनाच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. या लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. आम्ही नाटक करणारी माणसे नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. याला मनसे नेत्यांनी उत्तर दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे पुतणे असलेल्या अमित ठाकरेंनी काकांना प्रत्युत्तर दिले.

वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला

पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ‘बिनशर्ट पाठिंबा’ हा केलेला विनोद समजायला १० मिनिटे लागली. वरळीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेव्हा त्यांना काही वाटले नाही. तेव्हा पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार केले. या गोष्टी विसरता कामा नये. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे, तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू, असे अमित ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. तसेच आमदार निवडून दिला की, त्याच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्षे असतात. कोरोना काळात वरळी मतदारसंघ, वरळी कोळीवाड्यात ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरताना दिसले नाहीत. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही होणार नाही. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता. 

आमची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याबाबत माहिती देताना अमित ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पक्ष कामाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होती. मी सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार आहे. लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

दरम्यान, वरळीत मनसेचा पदाधिकारी उभा राहिला तर त्याचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा अनिल परब यांनी केला होता. यावर अमित ठाकरेंनी पलटवार दिला. मनसेचे डिपॉझिट जप्त होईल, हे आत्ताच सांगायला, अनिल परब सर्व्हे कंपनीत कामाला लागल आहेत का? ही गोष्ट लोकांना ठरवू द्या ना. गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे यांना २० ते २५ हजारांचे लीड होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७ हजारापर्यंत लीड खाली आले. विचार करुन बोलले पाहिजे, या शब्दांत अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
 

Web Title: mns amit thackeray replied uddhav thackeray over criticism on raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.