MNS: "दाऊद आदर्श असलेल्या 'मटण करीं'ना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:55 AM2022-03-22T10:55:38+5:302022-03-22T11:23:20+5:30
मनसेच्या अमेय खोपकरांनी तीव्र संताप व्यक्त करत अमोल मिटकरींना सुनावलं होतं.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मनसे, शिवसेनेकडून सोमवारी राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे. हा सण तिथीनुसार साजरा करायला हवा असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(MNS Raj Thackeray) २१ मार्चची शिवजयंती जल्लोषात साजरी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले होतं. त्यानुसार, मनसेकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पवृष्टी साजरी करण्यात आली. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला टोला लगावला. त्यानंतर, मनसे नेत्यांनीही मिटकरींना चांगलंच फैलावर घेतलं आहे.
मनसेच्या अमेय खोपकरांनी तीव्र संताप व्यक्त करत अमोल मिटकरींना सुनावलं होतं. शिवजयंती ही आमच्यासाठी सण-उत्सव आहे. दिवाळी, गणपती यांसारखी हिंदू सणांप्रमाणे शिवजयंती आमच्यासाठी सण आहे, असे उत्तर अमेय खोपकर यांनी दिले होते. त्यानंतर, आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मिटकरींना मटण करी असा टोला लगावत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ''जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.'', असे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 21, 2022
फालतू राजकारण करू नका - खोपकर
मिटकरी फालतू राजकारण करू नका, तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला दरवेळेस तुमचं हेच असतय, कसल्या गोष्टीचं राजकारण करता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असे अमेय खोपकर यांनी म्हटले. त्यावर, तुमची अक्कल किती आहे, हे मला माहितेय, असा पलटवार मिटकरी यांनी केला. तसेच, शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणून दाखवा, असे आवाहनही दिले. त्यावर, तुमच्या सांगण्यावरुन मी का म्हणू, थोड्या वेळात लाईव्ह बघा... असे प्रत्युत्तर अमेय खोपकर यांनी मिटकरींना दिले.
काय म्हणाले होते मिटकरी
आमदार अमोल मिटकरी(NCP Amol Mitkari) म्हणाले की, शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी व्हायला हवी. रोज साजरी झाली तरी हरकत नाही. परंतु आज जी जयंती साजरी करतोय ती मतांसाठी केली जातेय. मला माझं मत मागण्याचा अधिकार आहे. शिवजयंती(Shivjayanti) साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करता का? छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदुचे होते का? ते सर्वांचे होते. १९ फेब्रुवारीला महात्मा फुले यांनी साजरी केली. १९ फेब्रुवारीच शिवजयंती असावी हे शासनमान्य झालं आहे असं त्यांनी सांगितले.