लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा कायम ठेवून त्यांच्या सुरक्षेत एक पोलीस अधिकारी आणि एक अंमलदार यांची वाढ करण्यात आली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारने चालविलेली ही थट्टा आहे, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आम्ही मागणी काय करतो आणि सरकार काय संरक्षण देते कळत नाही. राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मी तक्रारदेखील केली. असे असताना सुरक्षेत केवळ दोन कर्मचाऱ्यांची वाढ करून वाटाण्याच्या अक्षता लावत आहे, अशी टीका नांदगावकर यांनी केली. राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राकडून फार मोठी अपेक्षा नाहीच; पण राज्य सरकारही गंभीर दिसत नाही, असेही ते म्हणाले.