मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीची ४ वैशिष्ट्ये! अमित ठाकरेंच्या उमेदवारी मागचं गणित काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:44 PM2024-10-23T13:44:05+5:302024-10-23T13:46:57+5:30

MNS Candidate list: मनसेच्या यादीत जाहीर करण्यात आलेले मतदार संघ आणि उमेदवार पाहता काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. मनसेच्या यादीची ४ वैशिष्ट्य जाणून घेऊयात... 

mns announces 45 candidates list here are 4 key points amit thackeray contesting election from mahim | मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीची ४ वैशिष्ट्ये! अमित ठाकरेंच्या उमेदवारी मागचं गणित काय?

मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीची ४ वैशिष्ट्ये! अमित ठाकरेंच्या उमेदवारी मागचं गणित काय?

लोकसभा निवडणूक न लढवता महायुतीला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा ज्यावेळी राज ठाकरे यांनी केली होती. त्याचदिवशी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागा असा स्पष्ट संदेश दिला होता. लोकसभा निवडणूक सरली आणि पुढे विधानसभा निवडणुकीसाठीचं वातावरण तापायला लागलं तसं मनसेच्या बाबतीत एक गोष्ट यावेळी प्रकर्षानं दिसू लागली ती म्हणजे पडद्यामागची तयारी. राज ठाकरेंनी दौराही केला आणि ते जिथं गेले तिथं विधानसभा जोरदार तयारीनं लढणार हे सांगत होते. काल रात्री उशिरा मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठीची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एकूण ४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचंही नाव जाहीर करण्यात आलंय. तर यादीत जाहीर करण्यात आलेले मतदार संघ आणि उमेदवार पाहता काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. मनसेच्या यादीची ४ वैशिष्ट्य जाणून घेऊयात... 

वैशिष्ट्य क्रमांक १: निष्ठावंत आणि कडवं आव्हान देतील अशा चेहऱ्यांना प्राधान्य

संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नयन कदम, गजानन काळे, महेंद्र भानुशाली यांची नावं या यादीत आहेत. त्यात शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाचा यादीत समावेश नसला तरी राज यांनी याआधीच एका कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा केली होती. यादीत पहिल्या क्रमांकावर विद्यामान आमदार राजू पाटील यांच्या नावाचा समावेश केलाय. निष्ठावंतांसह मतदार संघांचा स्थानिक पातळीवर आढावा घेऊन ज्या ज्या मतदार संघांमध्ये प्रस्थापित उमेदवारांना आव्हान देऊ शकतील अशा चेहऱ्यांना संधी दिलेली दिसून येते. यात खडकवासल्यात मनसेचे गोल्डनमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, कोथरुडमध्ये किशोर शिंदे, श्रीगोंदा संजय शेळके, आष्टी कैलास दरेकर अशा नावांचा समावेश दिसतो. 

वैशिष्ट्य क्रमांक २: हक्काच्या मतांवर लक्ष

मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीतील मतदार संघ पाहिले तर जिथं मनसेला आजवर चांगलं मतदान झालं आहे अशा ठिकाणांचा समावेश आहे. म्हणजे मतदार संघातील मतांच्या गणिताचा कागदोपत्री अभ्यास पडद्यामागे झालेला दिसून येतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, शहापूर, जळगाव शहर, सोलापूर शहर अशा शहरी मतदार संघांवर मनसेची भिस्त दिसून येते. त्यामुळे हक्काची मत असलेल्या मतदार संघांचा या यादीत समावेश केला गेलाय असं म्हणता येईल. 

वैशिट्य क्रमांक ३: राज सुपुत्र अमितही रिंगणात

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्याची दाखवलेली तयारीही सुचक दिसते. याआधी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे निवडणूक लढवली तेव्हाही वरळी मतदार संघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. पर्यायानं यानं पक्षालाही एकप्रकारे बूस्टर मिळाला होता. आता मनसे एक पक्ष म्हणून या निवडणुकीकडे किती गांभीर्यानं बघतोय हे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीतून त्यांनी सिद्ध केलेलं दिसतं. अमित ठाकरेंच्या रुपानं विधानसभा निवडणुकीची मनसेची चर्चाही राहील आणि स्वत: ठाकरे कुटुंबातील सदस्य आता थेट परीक्षेला बसणार असल्यानं राज्यात कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीच्या गांभीर्याबाबत भक्कम संदेश जाईल. कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील. 

वैशिट्य क्रमांक ४ : नाशिकचा समावेश नाही

मनसेची दुसरी यादी आली तरी नाशिक जिल्ह्यातील एकाही मतदार संघाचा समावेश नाही हेही एक वैशिट्य म्हणावं लागेल. एकेकाळी नाशिक मनसेचा गड होता. मुंबईनंतर नाशिकमध्येच मनसेचा चांगला मतदार आहे. असं असतानाही नाशिक जिल्ह्यातील १५ मतदार संघांपैकी एकाही मतदार संघाचा यादीत समावेश नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावरील मनसेची पकड कमी होतेय का? की मनसे अजूनही नाशिकच्या बाबतीत वेट अँड वॉचच्या भूमिका आहे? असा सवाल उपस्थित होतो. मनसेचे नाशिकमधून २००९ मध्ये तीन आमदार निवडून आले होते.  तर नाशिक महानगरपालिकेवर ४० नगरसेवकांसह मनसेनं सत्ता प्रस्थापित केली होती. नाशिकमध्ये मोजके चर्चेतील चेहरे वगळता तुल्यबळ उमेदवार नसल्यानं मनसेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे का? की  इतर पक्षातील नाराज आणि आयारामांना मनसे पक्षात घेणार? हे पाहावं लागेल. 

Web Title: mns announces 45 candidates list here are 4 key points amit thackeray contesting election from mahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.