अंधेरी आरटीओवर मनसेची धडक
By Admin | Published: March 12, 2016 02:45 AM2016-03-12T02:45:49+5:302016-03-12T02:45:49+5:30
नव्या रिक्षा परवान्यांचे वितरण करताना सरकारने परप्रातीयांना जाणीवपूर्वक खिरापत वाटली आहे. हा प्रकार मराठी तरुणांवर अन्याय करणारा आहे.
मुंबई : नव्या रिक्षा परवान्यांचे वितरण करताना सरकारने परप्रातीयांना जाणीवपूर्वक खिरापत वाटली आहे. हा प्रकार मराठी तरुणांवर अन्याय करणारा आहे. याचा निषेध म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अंधेरीमधील आरटीओ कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली.
अंधेरीमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी एम. बी. जाधव यांची भेट घेत मनसेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना या नव्या परवान्यांचे वितरण करण्यात यावे, असे म्हणणे मांडले. मनसेच्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी आरटीओ कार्यालयावर धडक दिली. या वेळी संजय घाडी, उपाध्यक्ष शरद सावंत, संदीप दळवी, नयन कदम, नगरसेवक चेतन कदम, मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे, विभागाध्यक्ष मनिष धुरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठी तरुणांवर अन्याय
परवान्यांसाठीचा अर्जदार हा स्थानिक रहिवासी असला पाहिजे. त्याला मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे. त्याच्यावर कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद असता कामा नये, या अटींचा समावेश आहे. या अटी केवळ येथील भूमिपुत्रच पूर्ण करू शकतो. तरीही परिवहनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीत जेमतेम दहा टक्के मराठी नावे दिसत आहेत. याचा अर्थ ही प्रक्रिया मराठी तरुणांवर अन्याय करणारी आहे.
- शालिनी ठाकरे,
सरचिटणीस (मनसे)