टाईम्स टॉवरमधील आगीच्या घटनेवरुन मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल; वाचला अनधिकृत बांधकामांचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:36 AM2024-09-06T11:36:01+5:302024-09-06T11:39:56+5:30
मुंबईतील लोअर परळ परिसरात असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला आग लागल्याची घटना आज सकाळी समोर आली.
मुंबईतील लोअर परळ परिसरात असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला आग लागल्याची घटना आज सकाळी समोर आली. या आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरातील नागरिकांच्या भितीचे वातावरण पसरले होते. आता आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, आता या घटनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेच्यासंदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर आरोप केले आहेत.
लोअर परळमधील टाईम्स टॉवरला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, पाहा VIDEO
कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेल्या आगीवरुन संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर आरोप केले. देशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तयांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, कमला मिल मध्ये गेल्या पाच वर्षात ही तिसरी आग लागली आहे. या ठिकाणी बांधकाम अनियंत्रित सुरू आहे. महानगरपालिका, स्थानिक आमदार असतील तीन तीन आमदार या वरळीत आहेत. स्थानिक आमदारांचे अनधिकृत बांधकामाकडे लक्ष नाही. या इमारतीचे जर फायर ऑडिट झालं होतं, तर मग स्प्रिंकलर का सुरू झाले नाही. स्थानिक प्रशासन आणि स्थानिक आमदार काय करत आहेत. हे फक्त हप्ते गोळा करण्याचा काम करत आहेत का?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला.
"ही तिसरी आग लागली आहे, आग लागली की प्रशासन फक्त नाटक करते. कमला मिल परिसरात अनेक अनधिकृत बांधकाम आहेत. ही बांधकाम कोण बांधत आहेत, यांच्यावर क्रिमिनट अॅक्शन घेतली पाहिजे, अशी मागणी देशपांडे यांनी केली. "अनेक तक्रारी असूनही प्रशासन कारवाई होत नाही. कारण स्थानिक आमदारांचा वरदहस्त इथल्या नाईट लाईफला आहे. यामुळे कारवाई होत नाही. सुदैवाने रात्री लागल्यामुळे ऑफिसमध्ये कोणी नव्हते. ही आग दिवसा लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, त्यामुळे ज्यांनी फायर ऑडिट केलेले नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/inFVxddehy
— Lokmat (@lokmat) September 6, 2024